Maharashtra SSC results 2020 : २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी

दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदा १८.२० टक्के वाढ

दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदा १८.२० टक्के वाढ

पुणे : राज्य मंडळाच्या १९७५ पासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला असून राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळाले आहेत.

अंतर्गत मूल्यमापनामुळे गुणांची खैरात, सामाजिकशास्त्र विषयाचा १२ टक्क्यांनी उंचावलेला निकाल यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल यंदा १८.२० टक्क्यांनी वाढला. कोकण विभाग निकालात अग्रस्थानी असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३.०१ टक्क्यांनी अधिक आहे.

गेल्या वर्षी राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते, तर यंदा २४२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १० पटींपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  ३ ते २३ मार्च या कालावधीत नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

करोना विषाणू संसर्गामुळे भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या विषयाचे गुणदान अन्य विषयांतील लेखी परीक्षेतील गुणांची सरासरी विचारात घेऊन देण्यात आले.

गेल्या वर्षी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण न दिल्याने निकालात जवळपास १२ टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाचे गुण न देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर मोठय़ा प्रमाणात टीका झाली. तसेच पुन्हा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची मागणी करण्यात आली. राज्य शासनाने ही मागणी मान्य करून अंतर्गत गुणांची पद्धत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला. एकू ण निकाल पाहता पुन्हा अंतर्गत गुणांची खैरात झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याशिवाय यंदा सामाजिक शास्त्रे या विषयाच्या निकालात जवळपास १२ टक्क्यांनी वाढ होऊन या विषयाचा निकाल १०० टक्के लागला. हा वाढलेला टक्का एकू ण निकालावर परिणाम करणारा ठरल्याचे दिसून येत आहे. परीक्षा घेण्यात आलेल्या ६० विषयांपैकी २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

अंतर्गत गुण पुन्हा सुरू के ल्याचा निश्चित परिणाम निकालावर झाल्याचे दिसून येते. कृतिपत्रिकांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मिळाले तर पूर्ण गुण, अन्यथा शून्य गुण असा प्रकार होतो. विद्यार्थ्यांचे लेखन अतिशय कमी झाले आहे. ८० टक्के प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. तसेच करोना संसर्गामुळे मूल्यमापनामध्ये हेळसांड झाली की काय अशी शंका वाटते. झटपट निकाल तयार करण्याच्या प्रयत्नात काटेकोर परीक्षण झाले का, असा प्रश्न मनात येतो. सहजतेने मूल्यमापन झालेले असू शके ल असे वाटते. समाजाच्या दृष्टिकोनातून ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि जेईई, सीईटीमधील उत्तीर्णतेचे प्रमाण यातील तफावत पाहिल्यास आपल्या माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी-पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. तसेच समाजाच्या दृष्टीनेही हे घातक आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी या निकालाने हुरळून न जाता अकरावी-बारावीला कष्टपूर्वक अभ्यास के ला पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.

मंडळनिहाय निकाल

पुणे – ९७.३४ टक्के

नागपूर – ९३.८४ टक्के

औरंगाबाद – ९२ टक्के

मुंबई – ९६.७२ टक्के

कोल्हापूर – ९७.६४ टक्के

अमरावती – ९५.१४ टक्के

नाशिक – ९३.७३ टक्के

लातूर – ९३.०९ टक्के

कोकण – ९८.७७ टक्के

महत्त्वाच्या तारखा..

* गुणपडताळणीसाठी अर्ज : ३० जुलै ते ८ ऑगस्ट

* उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज : ३० जुलै ते १८ ऑगस्ट

(उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे आवश्यक)

गुणवंतांची वाढ..

पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या २४२ विद्यार्थ्यांपैकी १५१ विद्यार्थी एकटय़ा लातूर विभागातील आहेत. पुणे विभागातील १२, नागपूर विभागातील तीन, औरंगाबाद विभागातील ३६, मुंबई विभागातील दोन, कोल्हापूर विभागातील १५, अमरावती विभागातील १२, लातूर विभागातील १५१, कोकण विभागातील ११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. एकटय़ा नाशिक विभागातील एकाही विद्यार्थ्यांला शंभर टक्के गुण मिळालेले नाहीत.

९० टक्क्यांहून अधिक..

यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले २८ हजार ५१६  विद्यार्थी होते. या वर्षी ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ हजार ७४६ विद्यार्थी वाढले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra board ssc 10th result 2020 over 95 percent students pass zws