Marathi News updates 8 february 2023 : शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या सातव्या टप्प्यात काल औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यामधील महालगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभा सुरू असताना या ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली. त्यामुळे सभास्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला, असा आरोप शिवसेनेचे विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यावरून पुन्हा राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai-Pune News : “मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
वंचित बहुजन आघाडी महाविकास आधाडीतमध्ये आल्यास त्याचा फायदाच होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाबाबत विचारलं असता, महाविकास आघाडीत असणाऱ्या नेत्यांनी किंवा महाविकास आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं करू नये, असं सल्ला अजित पवार यांनी दिला.
बुधवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला काही विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या आणि त्यास उत्तर दिले नाहीतर माझ्या समोर हजर करा, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात अधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण- सफाई कामगाराचा खाकी गणवेश घालण्यास लागू नये. दररोज सकाळीच उठून रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करावे लागू नये, म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील १७६ सफाई कामगार गेल्या दोन वर्षापासून पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, विविध अधिकाऱ्यांच्या दालन, फेरीवाला हटाव पथकात शिपाई, इतर सेवकांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. सविस्तर वाचा…
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या ४० उमेदवारांपैकी ३३ उमेदवारांची उमेदवारी वैध ठरली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) मनोहर पाटील यांच्यासह सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला; तसेच एबी अर्जापैकी बी अर्ज अपूर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका उपहारगृहचालकाने फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका उपहारगृहचालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. सविस्तर वाचा…
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत. याची थेट झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…
सोयाबीन-कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता येत्या ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा किंवा मुंबईत आत्मदहन करण्याची घोषणा केल्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत झाले आहे.
अकोला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाने अवैध सावकारीला कंटाळून जीवन संपवले, तर दुसऱ्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
अंधेरीतील एका दुकानामध्ये चोरी केल्याप्रकरणी अधेरी पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सिद्धेश रघुनाथ पाटील आणि विकास ब्रिजेश मिश्रा, अशी या दोघांची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निकाल येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने चिन्हाबाबात निर्णय देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच काही लोकं सर्वोच्च न्यायालयालाच मार्गदर्शन करत असतील, तर त्यावर आम्ही काय बोलायचं? असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
ठाण्यातील घोडबंदर भागात एका १२ वर्षीय मुलाचा नातेवाईकाने लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या लैंगिक छळामुळे मुलाच्या मानसिकतेवरही परिणाम झाला आहे. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर भागात पिडीत मुलगा हा त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. सविस्तर वाचा…
जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा आणि या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढावा, या उद्देशातून सर्वच ठिकाणी अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर अशा शाळांची निर्मिती करण्यात येणार असून त्याठिकाणी शाळांचा चेहरा-मोहरा बदलून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…
रस्ते, पदपथ नागरिकांना मोकळे असले पाहिजेत या अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानंतर डोंबिवली पूर्व फ प्रभागाने रेल्वे स्थानक परिसरातील, वर्दळीच्या रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. पाथर्ली नाक्यावरील पदपथावरील जुन्या फर्निचर बाजारावर कारवाई करुन तेथील सामान जप्त करण्यात आले. सविस्तर वाचा…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रूझ – चेंबूर जोड रस्ता विस्तारीकरणाअंतर्गत कुर्ला – वाकोला आणि भारत डायमंड बोर्स – वाकोला उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे.
राज्यपाल बदलण्याचे अधिकार ना मला आहे ना आदित्य ठाकरेंना आहे. तो केंद्रीय व्यवस्थेचा विषय आहे मात्र, आदित्य ठाकरेची राजकारणात सुरूवात असताना ते मोठे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
व्यसनी पती भावांच्या सांगण्याप्रमाणे त्रास देत असल्याचा आरोप करत कंटाळलेल्या महिलेने गाव पंचायतीत तक्रार केली, मात्र निकाल तिच्याविरोधात लागल्याने तिने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. रबाळे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पती आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमाला वयाचे बंधन नसते. मात्र, प्रेमासारख्या पवित्र भावनेला अभिव्यक्त होण्यासाठी शब्दाचीही गरज नसते. याचीच प्रचिती गोंडपिपरी येथे अनुभवायला मिळाली. प्रियकर व प्रेयसी दोघेही जन्मजात मूकबधिर. बोलायला शब्द नाही.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी ठाणे शहरांसह उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या शहरांतील हवा प्रदूषित असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मोजण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकावरून समोर आले होते.
ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. ठाणे पोलीस दलातील १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या यामध्ये करण्यात आल्या असून, यामध्ये नवी मुंबई आणि मुंबई पोलीस दलातून ठाणे पोलीस दलात हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांचाही सामावेश आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेसंदर्भात दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांनी घेतेलेल्या या तडकाफडकीच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, “कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत.” असं म्हटलं होतं. यावर आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. वाचा सविस्तर बातमी…
डोंबिवली- चटपटीत, झटपट, झणझणीत, वेष्टण बंद खाद्याचे कितीही चवीदार पदार्थ बाजारात आले तरी तृण धान्यातून मिळणारी पौष्टिकता शरीर सुदृढतेसाठी खूप महत्वाची आहे. याची जाणीव जगाला झाली आहे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती डोंबिवलीतील ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी दिली. सविस्तर वाचा…
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असेलल्या ९ आरोपींना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व आरोपांना पालिकेच्या रुग्णालात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत सध्या ९ आरोपी आहेत.
महाड एमआयडीसीतील मल्लिका स्पेशालिटी या कारखान्यात आजसकाळी १०: ३० च्या सुमारास आग लागली. कारखान्यातील इथिलिन ऑक्साईड प्लॉट हि आग लागली. या आगी दरम्यान स्फोट देखील झाले.
धुळे-पिंपळनेर (ता.साक्री) येथे चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी दोन बालकांसह अन्य दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराकडे अनेकांचं लक्ष लागले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपलं असल्याने त्यापूर्वी हा मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता कमी आहे. या अधिवेशनातही काही खात्यांचा पदभार हा इतर मंत्र्यांवर देण्यात येणार आहे, दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. सविस्तर वाचा
म्हाडा सोडतीच्या कायमस्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होऊन एक महिना पूर्ण झाला असून या महिन्याभरात नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत (बुधवार, दुपारी ११) ९९ हजार २४८ इच्छुकांनी नोंदणी केली आहे.
मिहान प्रकल्पामुळे मोठी औद्योगिक क्रांती होईल, अशी स्वप्नं दाखवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांकडून काही लाखांत घेतलेल्या जमिनी व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांत विकण्यात आला. या प्रकल्पामध्ये सरळ सरळ व्यवसाय झाला असल्याचा घणाघाती आरोप मिहान संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबा डवरे यांनी केला आहे.
कारमधील १ कोटी ९७ लाखांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काच फोडून चोरून नेली. ही खळबळजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गणेश नगर परिसरात २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. मात्र, तक्रार ५ फेब्रुवारीला नोंदविण्यात आली. बिजनेस लोनच्या नावावर जमा केलेली ही रक्कम हवालाची असल्याची माहिती पुढे आली आहे.
रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याने झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाचा दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
शिवसेना एकच आहे. मी दुसरी शिवसेना मानत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच गेले सहा-सात महिने शिवसेनेचं काय होणार? पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचं काय होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेनं आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. त्यामुळे सदस्य अपात्रतेचा निर्णय निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वी लागावा, अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदांसह इतर त्रुटी बघून पदवीचे प्रवेश थांबवले होते. वैद्यकीय शिक्षण खात्याने झटपट कंत्राटी शिक्षक भरल्याने या जागा वाचल्या.
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पातील कल्याण-डोंबिवली ते ठाणे-वसई जलमार्गावरील नऊ थांब्यांपैकी भिवंडी जवळील काल्हेर खाडी किनारी पाणतळ (जेट्टी) बांधण्याची निविदा प्रक्रिया महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरू केली आहे. २२ कोटी ३० लाख ४३ हजार २३० रुपये खर्चाचे हे काम असणार आहे.
नाशिक शहर परिसरात नशा आणणाऱ्या पदार्थांची विक्री होत असल्याने पोलिसांकडून याविरोधात कारवाईस सुरुवात झाली आहे. कॉलेजरोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत वेगवेगळ्या स्वादातील प्रतिबंधित निकोटीनयुक्त ८८ हजार रुपयांचे इलेक्ट्राॅनिक (इ) सिगारेटचे नऊ खोके पोलिसांनी जप्त केले.
केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१५) घोषणा करण्यात आलेल्या स्मार्टसिटी योजनेतील स्मार्ट शहरे महाराष्ट्रात निवड झालेल्या आठपैकी एकाही शहरात आकार घेऊ शकली नाहीत.
इंग्लंडमधील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे व भारतातील डॉक्टरांसह परिचारिकांना रोजगारासह जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची इंग्लंडला चांगली सोय करण्यासाठी ब्रिटिश असोसिएशन ऑफ पीपल्स विथ इंडियन (बापीओ)कडून प्रयत्न होतात.
शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे हे तब्बल ६१ कोटींचे धनी आहेत. त्यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
तळजाईच्या जंगलात एका बांधकाम व्यावसायिक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौस्तुभ सुरेश देशमुख (वय ३३, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी २७ फेब्रुवारीपासूनपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी पाच आठवड्याचा करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) एकीकडे नवनवीन विभाग वाढल्यावरही परिचारिकांची पदे वाढवली जात नाहीत. दुसरीकडे त्वचारोग विभागाचा मेयोत एकही वार्ड नसताना प्रशासनाकडून येथे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) निरीक्षणादरम्यान वार्ड दाखवण्याची बनवाबनवीचा मंगळवारी प्रयत्न केला.
देवनार कचराभूमी, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदुषणाचा धोका वाढत आहे. परिणामी, या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे.
आज १२.३० वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ते कोणावर निशाणा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवाळीनंतर डाळी, तसेच कडधान्यांचे दर कडाडले असून होळीपर्यंत डाळी, कडधान्याचे दर ‘जैसे थे’ राहणार असल्याचा दावा वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) घाऊक व्यापाऱ्यांनी केला आहे.
जमिनीत बिळ करून राहणारा लाजराबुजरा साळींदर हा वन्यजीव थेट शहरातील रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र उत्सुकता पसरली. वन्यजीव अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याचा हा परिणाम असल्याचे वन्यजीवप्रेमी आशीष गोस्वामी म्हणाले.
जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोघे चालक राष्ट्रीय महामार्गावर कोसळले. त्याचवेळी एका दुचाकीस्वार तरुणाला भरधाव मोटारीची धडक बसल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक नन्नवरे (२०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रामकुंड परिसरात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे अस्थिविसर्जन, विघटनास अडथळा निर्माण होत आहे. यातील झरे मोकळे करण्यासाठी रामकुंडासह गोदाकाठातील काँक्रिटीकरण काढण्यात यावे, अशी मागणी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केली आहे.
शिवसेनेचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या महालगाव दौऱ्याच्या वेळी काही तरुणांनी त्यांच्या गाडीसमोर हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला, तर सभेच्या ठिकाणी काहीजणांनी दगडही फेकल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने करण्यात आला आहे.
विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जयंत पाटील, ॲड.आशिष शेलारांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी २७ फेब्रुवारीपासूनपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. तर २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे.
देशभरात विरोधकांकडून गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपा यांच्या कथित मित्रत्वाच्या संबंधांवरून रान पेटवलं जात आहे. त्यात आता भाजपाचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा
निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्र्यांना वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.