Mumbai Pune Latest News Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेला भाजपा आणि शिंदे गटाकडून आजपासून सुरुवात केली जात आहे. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी आज काष्ट जाणार असून त्याच्या यात्रेमध्ये अनेक सेलेब्रिटी मंडळींची उपस्थिती अपेक्षित आहे, तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे.
Marathi Batmya Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहे. बापट यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
पुण्यात गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सांगली : द्राक्ष व्यापार्याला मारहाण करून एक कोटीहून अधिक रक्कम लुटणार्या टोळीला गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. लुटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बसवराज तेली यांनी बुधवारी सायंकाळी दिली.
महावितरण ग्राहकांना अधूनमधून लहान मध्यम धक्के देत राहते. मात्र, यावेळी जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणलाच तब्बल २१२३ कोटी रुपये थकबाकीचा मोठा ‘शॉक’ दिल्याचे चित्र आहे. यामुळे नूतन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या समक्ष महा वसुलीचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. सविस्तर वाचा…
अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीकविम्याची रक्कम मिळाल्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी मदतीस पात्र आहेत. यातील ९० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ झाल्या आहे. सविस्तर वाचा…
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे मूळ गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर. अनेकवेळा ते आपल्या गावी येत होते. गावातील प्रत्येक कुटुंबाला आपल्यातील माणूस गेल्याचे दु:ख झाले आहे. सविस्तर वाचा…
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती – राज ठाकरे
कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने आम्ही गिरीश बापटांना पाहिलं, ते पाहून आमचं मन अस्वस्थ झालं. ते ब्राह्मण समाजाचा चेहरा होते, पण तरीही सगळ्या समाजातल्या लोकांना गिरीश बापट आपले वाटत होते – संजय राऊत
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातून सागाचे काष्ठ अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यासाठी चंद्रपूरच्या बल्लारपूरमधून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी आता सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामाच्या दिवशी वीज देयके भरणा शक्य नसल्याने थकबाकी वाढत आहे. वीजबिल वसुली अत्यंत गरजेची असल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी, तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवारी राम नवमी, शनिवार व रविवारी वीज भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना सुरुवात होत असते. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच शहरातील धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, मुंबई लगत असलेल्या या ठाणे जिल्ह्यात शहरीकरण होऊनही छुप्या पद्धतीने बालविवाह सुरूच असल्याचे वास्तवही समोर आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि कल्याण या तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.
उजव्यांमधला डावा, अशी ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांनी आयुष्यभर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय मैत्री केली. ती मैत्री राजकारणाने डागाळली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा खरा पिंड होता. गेल्या काही वर्षांत राजकारणात जात धर्म यांना आलेले महत्त्व गिरीश बापटांना जराही शिवले नाही, याचे हे कारण. पक्ष म्हणून असलेली शिस्त पाळतानाही, आपल्या स्वभावाला मुरड किती आणि कशी घालायची, याबद्दलचे त्यांचे बरोबर आडाखे असत.
अलिबाग – मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे. केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत खारपाडा येथे हा सोहळा पार पडणार आहे. चौथ्या भूमिपूजन सोहळ्यानंतर तरी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा कोकणवासियांना असणार आहे.
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कंत्राटदार व वीज वितरणचे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.
गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. गिरीश बापट यांच्या जाण्याचे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गतीप्रदान करो अश्या शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.
ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान बापट यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१९ पासून ते पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यूने हळहळलेल्या चित्ताप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्यप्रदेशातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘साशा’ नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्यानातील दोन मादी चित्ता गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा…
प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून बडेजाव मिरवणाऱ्या जिल्ह्यातील ९ नेत्यांवर आता प्रदेश व जिल्हा काँग्रेस समितीची करडी नजर राहणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. सविस्तर वाचा…
आक्रमक व जहाल वक्तव्याबद्धल चर्चेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह अठरा जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. परवानगी नसताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य व भाषण करून जातीय तणाव व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
ई ऑफिस प्रणाली हा तर आता परवलीचा शब्द झाला आहे. पण त्याचे विकेद्रीकरण मात्र अपेक्षित असे झालेले नसल्याचे चित्र दिसून येते. वर्धा जिल्हा मात्र यात गतिमान ठरत असून तालुका पातळीवर असे संगणक संचालित कार्यालय कार्यरत होऊ लागले आहेत.
स्वातंत्र्यवीर सारवकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात असताना त्यासंदर्भात संजय राऊतांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात एनएसयूआयच्यावतीने चंद्रपूर शहरातील पडोली येथील प्रत्येक घरावर राहुल गांधी यांचे छायाचित्र लावून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव जनतेला करून दिली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीष बापट यांच्या निधनावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आली. पुणे जिल्ह्यातील एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावला. माझ्या राजकीय जीवनात बापट साहेबांनी कायम ताकद दिली. २०१४ ते २०१९ या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने माझ्या राजकीय वाटचालीतील गुरुतुल्य मार्गदर्शक हरपला आहे”, असे महेश लांडगे म्हणाले.
पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले – देवेंद्र फडणवीस
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते निर्धारानं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो – अजित पवार
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं – अजित पवार
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – शरद पवार
“पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिली.
गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मला मनाला विश्वास वाटत होता की आजारी असतानाही त्यांच्याबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतील. पण दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या ठरल्या. पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं – चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. बापट यांच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
आत्ताच गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी ऐकली. महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता – विनायक राऊत
आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय – जगदीश मुळीक
नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद काहिसे शमण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे शिंदे गटाने शहरात ‘बघा हेच खरे गद्दार’ असा उल्लेख करीत बुधवारी खासदार संजय राऊत यांना फलकाद्वारे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, याकडे छायाचित्राद्वारे लक्ष वेधण्यात आले.
नगर : महापालिकेची निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच नगर शहरात राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीसाठी रस्सीखेच आणि राजकारण सुरू झाले आहे.
जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातावर चक्क औषधी लिहून (प्रिस्क्रिप्शन) दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार येथील डॉक्टरांनी केला की परिसरातील असामाजिक तत्त्वांनी मेयोला बदनाम करण्यासाठी केला हे प्रशासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून स्पष्ट होईल.
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषी (पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील चौक) चौकात दुमजली उड्डाणपूल आणि हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पोलिसांकडून मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख लांबणीवर पडत आहे.
येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातावर चक्क औषधी लिहून (प्रिस्क्रिप्शन) दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार येथील डॉक्टरांनी केला की परिसरातील असामाजिक तत्त्वांनी मेयोला बदनाम करण्यासाठी केला हे प्रशासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून स्पष्ट होईल.
संजय राऊतांनी एक सूचक ट्वीट केलं असून त्यासोबत 'भारत माता की जय' असंही लिहिलं आहे. या ट्वीटमध्ये राऊतांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यात एक घोडा एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधल्याचं दिसत आहे. या फोटोवर “किती अजब गोष्ट आहे. जेव्हा गुलामीची सवय लागते, तेव्हा प्रत्येकजण आपली ताकद विसरून जातो”, असं लिहिलेलं आहे.
नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने सीबीडी गांजा विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली असून, त्याच्याकडून ७० हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. विशाल लक्ष्मण घोडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सीबीडी बेलापूर येथील टाटानगर झोपडपट्टीत राहतो.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांना इतकं आजारी असताना भाजपाने प्रचारात का उतरवलं म्हणून टीकाही झाली होती. आता त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याबाबत काही वेळाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी काल माध्यमांशी बोलताना दिले होते. दूध संघाच्या माजी सदस्यांनी अद्याप पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. सविस्तर वाचा
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आक्रमक झाले. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. गटतट विसरून काँग्रेस नेते यानिमित्ताने एकत्र आले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले.
सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्राही काढण्याची घोषणा भाजपा शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या यात्रेच्या आयोजनावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या यात्रेवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तर मिळत असतील तर आम्ही या यात्रेचं स्वागत करू असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
वने आणि वन्यजीव संरक्षणात लोकसहभाग वाढवण्यासाठी राज्याच्या वनखात्याकडून विविध उपक्रम राबवले जातात. आता याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वनगीतांची रचना तयार करण्यात येणार आहे. सोबतच संरक्षण आणि पोलीस खात्यात असणाऱ्या ‘बँड’ प्रमाणे वनखात्याचाही बँड तयार करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Marathi Batmya Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर