मुंबई : करोनामुळे आलेल्या मंदीचे सावट कमी होऊन राज्यातील अर्थव्यवहाराला चालना देण्यासाठी रस्ते, विमानतळ, मेट्रो, रेल्वे अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांवर आणि ऊर्जा क्षेत्रातील कामांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

जालना-नांदेड २०० किलोमीटरच्या  सात हजार कोटी रुपयांच्या महामार्गासह मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्ग, पुणे चक्राकार मार्ग, मुंबई-गोवा सागरी महामार्ग, नागरी भागातील मुख्य बाजारपेठांच्या रस्त्यांचे रुंदीकरण अशा विविध योजनांना गती देण्याची घोषणा करत सरकार विकास प्रकल्पांसाठी प्रयत्नशील असल्याचा संदेश मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसह विविध महानगरपालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील नागरी भागातील विकासकामांना चालना देण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे हा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका महत्त्वाच्या असल्याने या सर्व पालिकांचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांच्या सुधारणा व देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वित्तीय विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी के ली. आशियाई विकास बॅंक साहाय्यातून रस्ते विकासाची ५ हजार कोटी रुपयांची कामे २०२१-२२ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत.

मुंबईच्या विकासाच्या प्रकल्पांचा विशेष उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आला. वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. विरार ते अलिबाग बहुद्देशीय मार्ग प्रकल्पाचे भूसंपादन सुरू झाले आहे. ठाणे खाडीला समांतर असा १५ किलोमीटर लांबीचा ठाणे किनारपट्टी रस्ता बांधण्यात येत आहे. मुंब्रा बायपास, शिळ-कल्याण या मार्गावर उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे व नवी मुंबई या भागासाठी जलवाहतूक सुरू करण्यात येत असून त्यासाठी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली व मीरा-भाईंदर या चार ठिकाणी जेटी बांधण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रोमार्ग २ अ, ७ ही कामे २०२१ अखेर पूर्ण होतील, असेही अजित पवार यांनी सांगितले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ४०० कोटी रुपये, मुंबई पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे काम वर्षभरात हाती घेण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. समुद्रातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प मालाडजवळ मनोरी येथे उभारण्यात येत असून डिसेंबर २०२१ मध्ये प्रकल्प अहवाल अपेक्षित आहे. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पही लवकरच सुरू होणार आहे.

उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून रायगडमध्ये औषधनिर्माण पार्क  व औरंगाबादमध्ये वैद्यकीय उपकरण पार्क मध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. तर ऊर्जा विभागांतर्गत विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. सीएनजी-हायब्रिड बस घेण्याचे व समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर विद्युत वाहनांच्या चार्जिगसाठी मोठी सुविधा उभारण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. सौरकृषीपंपही मोठय़ा प्रमाणात देण्यात येणार आहेत.

सुरू असलेल्या प्रकल्पांचाच उल्लेख

पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्पांची यादी सादर करण्यात आली. प्रत्यक्षात यातील काही प्रकल्प अनेक वर्षे कागदावर आहेत किं वा सध्या कामे प्रगतीपथावर आहेत. शिवडी-न्हावाशेवा हा सागरी पूल दोन दशके  चर्चेत आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पांना सरकारच्या तिजोरीतून निधी दिली जाणार नाही. खासगीकरण किं वा सरकारी प्राधिकरणाच्या माध्यमातून हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.