Maharashtra Budget session 2026: आज (६ मार्च २०२६) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्यातील वारसा जपण्यासाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राला मोठा इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
या अर्थसंकल्पात राज्यातील वारसा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी घेण्यात आलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे:
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील १२ किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
२. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी निधी देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथील स्मारक आणि पानिपत, हरियाणा येथील काला अंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य केले जाणार आहे.
४. सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्लाः मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेणार येणार आहे.
५. छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत, मौजे वढू बुद्रुक समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्णत्त्वाचे नियोजन, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात, निधी देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
६. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार करणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले.
७. ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
८. एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवणार, त्यासाठी निधी देणार असल्याचे सांगितले.
९. महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
१०. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली.
११. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार स्थळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
१२. संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंतीवर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार असल्याचे सांगण्यात आले.
१३. महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून २०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार.
१४. जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर आणि जन्मस्थानाच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करणार
१५. नाशिक-त्र्यंबक कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
१६. नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करणार, महाकवि कालिदास यांचे जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले.
१७. पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
१८.५ ज्योर्तिलिंग विकासाची कामे सुरु, महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार असल्याची माहिती दिली.
१९. एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५० पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्मिती करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
२०. मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
