Maharashtra budget updates: महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ सालचा अर्थसंकल्प आज (६ मार्च) सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. यंदाचा अर्थसंकल्प अजितदादाच मांडणार होते; मात्र दुर्दैवाने तो मला मांडावा लागत आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यात अजित पवार यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
७५ हजार रिक्त पदांसाठी भरती
यावेळी राज्यातील विविध विभागांतील भरतीबाबतही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील काळात राज्यात टप्प्याटप्प्याने विविध विभागांमध्ये भरती करण्यात येणार आहे. भविष्यात राज्यात ७५ हजार रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तसेच इतर यंत्रणांच्या माध्यमातून केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत १ लाख २० हजार कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
सारथी, बार्टी, महाज्योतीसाठी तरतूद
तसेच सारथी, बार्टी, आर्टी, टीआरटीआय, महाज्योती, वनार्टी, अमृत आणि मार्टी या संस्थांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय आदिवासी समाजातील युवकांना नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योजक आणि उद्योगनिर्माते घडवण्यासाठी ‘भारत नवकल्पना, संशोधन आणि आत्मनिर्भरतेसाठी उद्योग निर्मिती – बिरसा’ ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
यासोबतच बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ‘स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ या योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला पिण्याचे पाणी व सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
