Maharashtra Budget 2026 Political comments: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प दिवंगत अजित पवारांना समर्पित केला. याचवेळी त्यांनी अजित पवारांचे स्मारक आणि त्यांच्या नावे पुरस्काराची देखील घोषणा केली. याशिवाय शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. सत्ताधाऱ्यांनी “विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प”, अशा शब्दात अर्थसंकल्पाचे स्वागत केले तर, विरोधकांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत टीका केली. कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा हा अर्थसंकल्प असल्याचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले. काय घडलं आज दिवसभरात? जाणून घेऊयात.
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, “अॅग्रीस्टॅक आणि महाविस्तार प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम जोरात सुरु आहे. सकाळच्या वेळेत देखील शेतकऱ्यांना वीज येत्या काळात देऊ. जागतिक पातळीवर विचार केल्यास महाराष्ट्र जगातील ३० क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अनेक महत्वाच्या देशांपेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठी आहे.” फडणवीसांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प सात लाख ६९ हजार कोटी रुपयांचा आहे.
विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी देखील फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे व्हिजनरी आणि खंबीर वाटचाल करणार अर्थसंकल्प असल्याचे नमूद केले. “शहरासोबतच ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे असा आमचा विचार आहे. यासाठी मेट्रो, महामार्ग, रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासह पायाभूत ,सुविधांची कामे सुरु आहेत. फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित केल्याबद्दल फडणवीसांचे आभार मानले. तसेच, हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राला चालना देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा अर्थसंकल्प – उद्धव ठाकरे
राज्यातील सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली नसल्याचे ठाकरे म्हणाले. आत्ता जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीतही अनेक अटी-नियम घालण्यात आल्याची टीका त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती पण, याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा हा अर्थसंकल्प असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारकडून शेतकऱ्यांचा पुन्हा विश्वासघात – राजू शेट्टी
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत तकलादू कर्जमाफी जाहीर करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. सात बारा कोरा करु सांगत प्रचार करुन मते मिळवली पण, सरकराने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. शेतीसाठी पायाभूत सुविधा, खते, बियाणे आणि प्रक्रिया यासाठी सबसिडी देण्याबाबात कोणतीही तरतूद नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच, नुकसान भरपाई देण्याबाबत ठोस आराखडा नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “राज्य व केंद्र सरकारच्या धोरणामुळेच शेती तोट्याची झाली असून कागदावरच्या उपाययोजनांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे”, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले.
शरद पवारांचा अर्ज सादर करताना दांडी का मारली? आदित्य ठाकरे म्हणाले…
शरद पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज सादर करताना गैरहजर का होते? याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. पण, त्यादिवशी उदयपूरला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सचिन तेंडुलकर यांचे पूत्र अर्जुनच्या लग्नाचे कारण देखील आदित्य यांनी देत नाराज असल्याचा दावा खोडून काढला. शरद पवारांच्या राजकारणातील स्थानाबाबत आदर आहेच पण, पक्षहिताची आणि पक्षासाठी, पक्षाच्या वतीने भूमिका मांडली त्यात माझा स्वार्थ नव्हता असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
