Maharashtra Budget Session Updates, 20 March 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये जोरदार भाषण करत उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. तसंच राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? शिवसेना जिथे कमकुवत आहे ती मजबूत करतो मला तेवढा भाग द्या असंच म्हटलं होतं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असाही उल्लेख एकनाथ शिंदेंनी केला. या भाषणाचे पडसाद आता दिवसभर उमटतीलच. सुषमा अंधारे यांनी या भाषणावर टीका करून झाली आहे. मी गद्दार नाही खुद्दार हे एकनाथ शिंदेंचं वाक्य म्हणजे दशकातला उत्तम जोक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय आज अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. या अधिवेशनात काय काय घडणार? कुठली विधेयकं पास होणार? कशावर चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडतील. त्यावरही आपलं लक्ष असेलच. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या विविध बातम्या

Live Updates
20:37 (IST) 20 Mar 2023
पालकमंत्री दीपक केसरकर यांना हटवण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढ विषयावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पदावरून दीपक केसरकर यांना हटवण्यात यावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा

18:59 (IST) 20 Mar 2023
‘बदलापूर’ सिनेमाची आठवण करून देणारी घटना नेरुळमध्ये, तब्बल २५ वर्षांनी उगवला सूड, वाचा नेमकं काय घडलं..

नवी मुंबई : १५ मार्चला संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील नेरुळ सेक्टर ६ येथे सावजी मंजिरी उर्फ पटेल या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या बांधकाम व्यावसायिकांच्या स्पर्धेत झाली असावी, असा अंदाज सुरवातीला होता. मात्र या हत्येचे धागेदारे २५ वर्षांपूर्वीच्या एका हत्येशी निगडित असून, गावातील दोन गटांतील वादात पटेल यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

18:35 (IST) 20 Mar 2023
जत : माजी नगरसेवकाच्या हत्येचा सूत्रधार माजी उपनगराध्यक्ष, चौघांना अटक

जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणी  पोलीसांनी चौघांना अटक केली असून या खूनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच  माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत असून तो फरार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

सविस्तर वाचा

18:25 (IST) 20 Mar 2023
डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेला निवडणुकीचे रुप? नेत्यांच्या फलकबाजीने डोंबिवलीत तीव्र संताप

डोंबिवलीत नववर्ष शोभा यात्रेच्या मार्गात राजकीय नेत्यांचे भव्य फलक, रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भव्य कमानी उभारण्यात आल्याने हे नववर्षाचे स्वागत आहे की, कोणत्या निवडणुकीची तयारी आहे, असे उव्दिग्न प्रश्न शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 20 Mar 2023
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट्याने घेतला ५३ माणसांचा बळी; खुद्द वनमंत्र्यांचीच कबुली

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यात वनखात्याला सातत्याने अपयश येत आहे. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा संघर्ष अधिकच मोठा आहे. २०२२ या एका वर्षात या जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ५३ लोक मृत्युमुखी पडले.

सविस्तर वाचा

18:17 (IST) 20 Mar 2023
‘अल निनो’मुळे यावर्षी पर्जन्यमानात घट होण्याची भीती

वातावरणातील बदल संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना येत्या पावसाळ्यात ‘अल निनो’मुळे पर्जन्यमानात घट होणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सूचित केले आहे.

सविस्तर वाचा

17:02 (IST) 20 Mar 2023
गतीअवरोध तंत्राचा वापर करुन सुखोईचा अपघात टाळण्यात वैमानिकांना यश

पुणे : भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सुखोई – ३० – एमकेआय या लढाऊ विमानासाठी गतीअवरोध तंत्राचा म्हणजेच एअरक्राफ्ट अरेस्टर बॅरिअर वापर करुन अपघात टाळण्यात वैमानिकांना यश आले आहे. पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनवर ही घटना घडली.

सविस्तर वाचा…

17:00 (IST) 20 Mar 2023
विद्यापीठ अधिसभा निवडणूक : केवळ २३ टक्के मतदान, ५१ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीला रविवारी ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. मतदारांचे मतदान केंद्र बदलल्याने आणि प्रशासनाकडून मतदान वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा प्रचार प्रसार न केल्याने केवळ २३ टक्केच मतदान झाले आहे.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 20 Mar 2023
रुग्णालयात बाह्ययंत्रणेद्वारे कर्मचारी नेमावेत; संपामुळे रुग्णांची गैरसोय नको, शंभूराज देसाई यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 20 Mar 2023
ठाणे : आला उन्हाळा…,घरातील विद्युत तारा तपासा; आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर टोरंटचे ग्राहकांना आवाहन

यंदा उन्हाळा महिनाभरआधीच म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरु झाला आहे. उन्हाच्या झ‌ळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा

15:08 (IST) 20 Mar 2023
पुणे : कोयता गँग पुन्हा सक्रिय; पर्वती पायथा भागात तरुणावर हल्ला

शहराच्या वेगवेगळ्या भागात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या महिनाभरापासून कोयता गँगचे गुन्हे काहीसे कमी झाले असताना पर्वती गाव परिसरात कोयता गँगने पुन्हा दहशत माजविली.

सविस्तर वाचा

14:59 (IST) 20 Mar 2023
टोळी युद्ध टळले, दोन पिस्तूलसह सराईत गुन्हेगाराला अटक

अवैध दारूविक्रीने चर्चेत असलेला वर्धा जिल्हा आता थेट पिस्तूल सापडल्याने चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाल्याने यातील गुंडांवर पोलीस नजर ठेवून होते. इतवारा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार रीतिक तोडसाम हा पुन्हा सूड घेण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण होती.

सविस्तर वाचा

14:49 (IST) 20 Mar 2023
४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन; अकोल्यात ऑनलाइन चिमणी गणना

काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांचे दर्शन दुर्लभ झाले. मात्र, अकोल्यातील ऑनलाइन चिमणी गणनेमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली. शहरातील ४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन होत असल्याचा निष्कार्ष काढण्यात आला.

सविस्तर वाचा

14:38 (IST) 20 Mar 2023
विदर्भ संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक

विदर्भाच्‍या संघात निवडीचे आमिष दाखवून दोघा आरोपींनी मुंबईच्या एका कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक केल्याची घटना‎ उघडकीस आली आहे. याप्रकरणी‎ शहर‎ कोतवाली पोलीस ठाण्यात‎ फसवणुकीचा‎ गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा

14:38 (IST) 20 Mar 2023
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडीने २३ मार्चपर्यंत कारवाई करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे

14:27 (IST) 20 Mar 2023
“राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”

‘जी- २०’चे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी सन्मानाची बाब आहे. भारताचा मान जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वाढतच चालला आहे. भारत देशाकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे काँग्रेसला भीती वाटत असून राहुल गांधी परदेशातून मदतीच्या शोधात आहेत. ते परदेशी संस्थांकडून मदत मागत आहेत.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 20 Mar 2023
कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातील संपकरी विविध संघटनांच्या समन्वय समितीला आज शासनाकडून चर्चेचे निमंत्रण आले. पण, दुपारी अकराची वेळ देऊनही बैठक सुरू न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे.

सविस्तर वाचा

13:40 (IST) 20 Mar 2023
म्हाडाने बांधलेली शौचालये पालिका दुरुस्त करणार, जिल्हा नियोजन समितीकडून १८८ कोटीचा निधी मंजूर

मुंबई: म्हाडा प्राधिकरणाने मुंबईत ठिकठिकाणी बांधलेली शौचालये आता महापालिकेमार्फत दुरुस्त केली जाणार आहेत. या शौचालयांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मुंबई महापालिकेला सुमारे १८८.८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे २९०० शौचालयांची पालिका दुरुस्त करणार आहे.

वाचा सविस्तर…

13:34 (IST) 20 Mar 2023
डोंबिवलीतील रिजेन्सी, रिजेन्सी अनंतम गृहसंकुलात तीव्र पाणी टंचाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार

डोंबिवली येथील शीळ रस्त्यावरील गोळवली-दावडी गाव हद्दीतील सुमारे २५ हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या रिजेन्सी अनंतम, रिजेन्सी गृहसंकुलात गेल्या आठवड्यापासून पुन्हा तीव्र पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. संतप्त झालेल्या रहिवाशांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 20 Mar 2023
बुकी अनिल जयसिंघानीला अटक

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

11:42 (IST) 20 Mar 2023
पुणे: सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले

पुणे: सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 20 Mar 2023
आधी जे गरीब खात होते तेच गहू-तांदूळ श्रीमंत खात आहेत – अब्दुल सत्तार

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

11:07 (IST) 20 Mar 2023
शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा, विरोधकांची घोषणाबाजी

कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात; पायर्‍यांवर ठिय्या देत जोरदार निदर्शने. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या.

10:59 (IST) 20 Mar 2023
पुणे: तरुणीने प्रेमाचे नाटक करुन पाच लाख रुपये उकळले, तरुणाची आत्महत्या

पुणे: प्रेमाचे नाटक करुन तरुणाकडून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये उकळणाऱ्या तरुणीच्या धमक्यांमुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.

वाचा सविस्तर…

10:51 (IST) 20 Mar 2023
नागपूर: समृद्धीला जोडणारा महामार्ग नागपूरजवळ चिखलाने माखला

नागपूर: हिंगणा तालुक्यातील गुमगावमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग (३५३) रविवारी झालेल्या पावसाने संपूर्णपणे चिखलाने माखला आहे. या महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून अपूर्ण आहे. कंत्राटदाराने २ किमीच्या रस्त्यावर केवळ मुरूम टाकून ठेवला आहे अवकाळी पावसाने या मार्गावर पूर्ण चिखल झाला. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे.

वाचा सविस्तर…

10:50 (IST) 20 Mar 2023
नागपूर: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लीलता, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “सहन…”

नागपूर: ‘ओटीटी’वर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

वाचा सविस्तर…

10:46 (IST) 20 Mar 2023
पुणे : अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद

पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

सविस्तर वाचा…

10:29 (IST) 20 Mar 2023
मध्य रेल्वेतून अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, दहा लाखांचा गांजा जप्त

वर्धा: मध्य रेल्वेच्या काही प्रवासी गाड्यांमधून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती आहे. रेल्वे पोलीस दलाने काही दिवसापासून पाळत ठेवणे सुरू केले होते.काही गाड्यांची खास तपासणी सुरू झाली होती.

वाचा सविस्तर…

10:27 (IST) 20 Mar 2023
बच्चू कडू, रवी राणा यांचे भवितव्य काय ?

अमरावती : भाजपा विधानसभा निवडणुकीच्‍या तयारीला लागलेला असताना प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाविषयी वक्‍तव्‍य केल्‍यानंतर सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 20 Mar 2023
पळस्पेजवळ कंटनेर उलटल्याने अपघात, चालकाला दुखापत

मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे अती वेगाने आलेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर जाऊन रस्त्यावर उलटला,त्यामुळे चालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,तर या ठिकाणची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती,मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, उलटलेला कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली,या कंटेनरमध्ये माल असल्याने आतील मालाचेही नुकसान झाले असून,सुदैवाने वेळीच लक्षात आल्याने चालक आणि वाहक दोघांनीही उड्या मारून आपला जीव वाचवला.

10:17 (IST) 20 Mar 2023
पावसामुळे गोंदिया जिल्हा ‘ठंडा-ठंडा, कूल-कूल’; तापमान २६ अंशांवर

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासून वादळी वारा व दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. याच्या परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्याचा पारा चांगलाच घसरला असून, रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान थेट २६अंशांवर घसरले होते. शिवाय रविवारीही दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असल्याने त्यामुळे आणखी काही दिवस असेच वातावरण राहणार असे दिसून येते आहेत.

10:12 (IST) 20 Mar 2023
सलमान खानला धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. लॉरेन्स बिश्नोईने मुलाखातीत हा दावा केला होता की, “सलमान खानला ठार करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.” ही धमकी आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

मुंबई पोलिसांनी काय उचललं पाऊल?

मुंबईतल्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी कलम ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ या अन्वये प्रकरण दाखल केलं आहे. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली आहे.

10:10 (IST) 20 Mar 2023
एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात, पण…”, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये भाषण केलं. ते भाषण उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील.’मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.