Maharashtra Budget Session Updates, 21 March 2023 : महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासू या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. यासंदर्भात दाखल याचिकेवर आज सर्वोच न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज या निवडणुकांचा मार्ग होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्तधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्यावरून काल विरोधकांनी सभात्याग केला होता. दरम्यान, आज सुद्धा शेतपिकांच्या पंचनाम्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यावरही आपले लक्ष असणार आहे.
Mumbai News : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी सरी, छत्री घेऊन ऑफिस गाठताना चाकरमान्यांची त्रेधा
सोमवारी राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जुन्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला आणि संप मागे घेतला, याबाबत सरकारी कर्मचारी संघ सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर संप मागे घेतला असल्याची घोषणा करण्यात आली.
जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीने मागे घेतला. समन्वय समितीने सर्वांना विश्वासात न घेता एकतर्फी संप मागे घेतल्याचा आरोप करून यवतमाळातील अनेक कर्मचारी संघटनांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली होती.
राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते, अशी टीका संजय राऊतांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केली होती. त्यांच्या या विधानावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टीका केली आहे. संजय राऊत जेलमध्ये १०० दिवस जेलमध्ये राहिले, तेव्हापासून त्यांचा स्वभाव बदलला. ते आता कैद्यांसारखी भाषा बोलायला लागले आहे, असे ते म्हणाले.
भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
मुंबई : विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये सजग राहून आपत्तीनुसार नागरिकांनी उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ‘आपदा मित्र’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन महिन्यांत ८२० स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी रस्त्यामध्ये घडलेल्या प्रसंगांमध्ये नागरिकांचे प्राणही वाचविले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’ संकटात धावून येत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे : कात्रज भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
नाशिक – येथील आनंदनिकेतन शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थापक अरुण ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वंचित घटकांसाठी, वेगळ्या वाटेने आणि प्रयोगशील पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम यांना जाहीर झाला आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात पुरस्कार सोहळा होणार आहे.
महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग, प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात आणि इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
https://twitter.com/sachin_inc/status/1638051377682477056?s=20
नवी मुंबई : शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दि. १६ मार्च ते २२ मार्च २०२३ या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून, या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाजमाध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना २२ मार्च रोजीच्या जागतिक जलदिनाच्या शुभेच्छा देत सध्याची जागतिक जलस्थिती व पर्यावरण स्थिती पाहता जलबचतीचे आवाहन राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती.
आनंदाचा शिधा लोकांना नाही, आमदारांना खोक्यात मिळतो, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केली होती. राऊतांच्या या टीकेला बच्चू कडून यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या स्वप्नात रोज खोके येतात. त्यांना मेंदूत फरक पडलाय, त्यावर उपचार करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली होती. या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांचं बोलणं हे नेहमीच खालच्या पातळीवरचं असतं, असं ते म्हणाले. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
पुणे: राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना. त्याच दरम्यान आज सकाळी पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकर्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यापासून शुकशुकाट असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, सहा उपविभागीय कार्यालये आणि १३ तहसील कार्यालयातील हजारो कर्मचारी आजपासून कामावर रुजू झाले आहे. याशिवाय इतर कर्मचारीसुद्धा नाईलाजाने का होईना कामावर परतले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी- निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असला, तरी समन्वय समितीचा हा निर्णय नाईलाजाने मान्य करावा लागत असून यापुढे समन्वय समिती सोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोणत्याच आंदोलनाच्या किंवा इतर वेळी समन्वय ठेवणार नाही.
फसवणूक तसेच इतर तत्सम फौजदारी प्रकरणात दोषसिद्धीसाठी आवश्यक असलेला हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल सादर करण्यासाठी राज्यात फक्त २५ तज्ज्ञ आहेत. गेल्या काही वर्षांपासून तब्बल साडेसात हजार कागदपत्रे तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात सध्या हस्ताक्षर तज्ज्ञांची ४० पदे असून त्यापैकी १५ पदे रिक्त आहेत.
केईएम, नायर आणि शीव या रुग्णालयांमधील सीटी स्कॅन यंत्रे जुनी झाली असून, अनेक रुग्णांना खासगी रुग्णालये अथवा केंद्रांमध्ये जाऊन सीटी स्कॅन करावे लागत आहे. परिणामी गरीब रुग्णांना अर्थिक झळ सोसावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने तिन्ही रुग्णालयांमध्ये अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत 'मातोश्री'ची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही, असं स्पष्टीकरण दिले.
जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून या मतदार संघावर झनक कुटुंबाचे वर्चस्व कायम आहे. मात्र, एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे.
राजुरा तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. संपाला एक आठवडा झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोवर संप सुरू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अशातच राजुरा तहसील परिसरात कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या आंदोलन सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.
संजय राऊतांचं बोलणं हे नेहमीच खालच्या पातळीवरचं असतं. हल्ली कोणीही संजय राऊतांची दखल घेत नाही. आज त्यांना राज्यात कोणीही किंमत देत नाही. भ्रष्टाचार केल्याच आरोप करणं हा एक भाग असतो आणि त्यात काही तथ्य असणं ही वेगळी गोष्ट असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपावर संबंधित नेते उत्तर देतील. फक्त राजकारण म्हणून कोणाला तरी बदनाम करण्याच प्रयत्न होऊ नये. कारण महाराष्ट्राचं राजकारण नेहमी जनतेच्या हिताचं राहिलं आहे. पण आज ते व्यक्तिगत पातळीवर उतरत आहे, यापेक्षा दुर्देवी गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.
ठाणे: जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही झाला. सोमवारी सकाळी मुकुंद कंपनी येथील पूलाखाली पाणी साचले आहे. त्यामुळे मुकुंद कंपनी ते कळवा पूल चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
ठाणे: ठाणे शहरात मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे चालण्यासाठी, कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. उद्या गुढीपाडवा असल्याने सोमवार रात्रीपासूनच स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांची तयारी सुरू होती.
संप संस्थगित केल्याचे जाहीर झाल्यानंतरही सोमवारी रात्री काही जिल्ह्यातील नेत्यांनी संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आज काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण दिसून आले. प्रामुख्याने गोंदिया,भंडारा, अमरावती व यवतमाळ येथील नेत्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
चंद्रपूर येथील वीज केंद्रातील विजय एंटरप्रायझेस या कंपनीच्या पर्यवेक्षकाने प्लांटमध्ये ६ महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतरही पोलिसांनी दीड महिन्यापासून गुन्हा दाखल केला नाही.
श्रीमंतीचे प्रदर्शन करावे तर किती? एरवी महापालिकेला अतिक्रमण दिसत नाही, पण शहरात जी-२० च्या आयोजनाने महापालिकेला या अतिक्रमणाची आठवण झाली आणि रस्त्यावर चहा, उसाचा रस विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे सामान चक्क उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला.
पुणे: माहेरी आलेल्या विवाहित बहिणीला ताप आल्यानंतर भावाने तिला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तेव्हा युवती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले.
पावसामुळे तालिकाध्यक्ष सुनील भुसारा यांना सभागृहात पोहोचायला उशीर झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी ते विधिमंडळाच्या गेटवरून सभागृहात पळत गेले. त्यांचा पळत जातानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या पावसामुळे अनेक अधिकाऱ्यांचीही धावपळ झाल्याचं बघायला मिळतं आहे.
एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय, अशा टीका संजय राऊतांनी शिंदे सरकारवर केली.
देशातल्या एका उद्योपतीसाठी भाजपा काम करते आहे. भाजपाच्या डोक्यात निवडणुकींशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळे निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार आहोत. – संजय राऊत
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आत्ताही काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. मार्चमधल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरीही अवकाळीने शेतकऱ्याची झोप उडवली आहे. तसंच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचीही तारांबळ उडाली आहे. मार्च महिन्यात सकाळी सकाळी मुंबईकरांना छत्री घेऊन ऑफिस गाठावं लागतं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे. संजय राऊतांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका अल्पवयीन लैंगिक अत्याचार पीडितेचा फोटो शेअर केल्यामुळा वाद निर्माण झाला आहे. पीडितेची ओळख जाहीर केल्यामुळे संजय राऊत वादात सापडले असताना त्यांच्याविरोधात बार्शीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याामुळे आता संजय राऊतांवर काय करावाई होणार? याविषयी चर्चा सुरू झालेली असताना संजय राऊतांनी मंगळवारी सकाळी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग याच्या विरोधातील कारवाईचे पडसाद देशभरासह विदेशातही उमटताना दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचंही समोर आलं होतं. दरम्यान, यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. भारताला ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान लाभले असताना तिरंगा उतरविण्याची अतिरेक्यांची हिंमत होतेच कशी? अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आत्ताही काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. मार्चमधल्या प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरीही अवकाळीने शेतकऱ्याची झोप उडवली आहे.