शेतकऱ्याच्या पत्नीकडं पीक कर्जाच्या बदल्यात बॅंकेच्या अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला. याप्रकरणी सेंट्रल बँकेचा शाखा अधिकारी राजेश हिवसे याला निलंबित करण्यात आलं आहे.

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील शेतकरी त्यांच्या पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरुवारी सकाळी गावातीलच सेंट्रल बँकेत गेले होते. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंतर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. इतकंच नाही तर, या मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही दिलं जाईल, असा निरोप त्यांनी शिपाई मनोज चव्हाण याच्यामार्फत महिलेला पाठविला. संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेतकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता, आणि राजेश हिवसे याला निलंबित करण्याची मागणी केली होती. अखेर तीन दिवसानंतर हिवसेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी सेंट्रल बँकेला काळंही फासलं होतं. हिवसे आणि चव्हाण हे दोघेही अद्याप फरार आहेत.

या प्रकरणावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली होती आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि संबधित शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. आता हे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली आहे.