बैलगाडीच्या शर्यतीमधील ‘बिनजोड छकडेवाला’ अशी ओळख मिळालेले पनवेल तालुक्यातील विहीघर गावातील पंढरीनाथ फडके यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना गोल्डमॅन असं म्हटलं जायचं. पंढरी फडके यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पनवेल शहरातील पॅनासिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष होते. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर त्यांनी अनेक पातळीवर ही शर्यत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर एका शर्यतीच्यावेळी पंढरी फडके व कल्याणचे बैलगाडा शर्यतीमधील त्यांचे स्पर्धक राहुल पाटील यांच्यामध्ये वाद झाले. या वादाचे पर्यवसन गोळीबारीच्या घटनेत झालं होतं. त्यानंतर फडके यांच्यासह त्यांचे अनेक साथीदारांना कारागृहात जावे लागले होते. पंढरी फडके यांना ‘गोल्डमॅन’ असंही म्हटलं जायचं.

पंढरी फडके फेमस कसे झाले?

पंढरी फडके हे त्यांच्या वडिलांच्या काळापासून म्हणजेच १९८६ पासून बैलगाडा शर्यतीत भाग घेत आले आहेत. त्यामुळे ते या शर्यतींच्या विश्वातलं एक विश्वासू आणि प्रसिद्ध नाव होत गेले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके अशी त्यांची ओळख बनली. गळ्यात मोठ्या प्रमाणावर सोनं बाळगल्याने ‘शेठ’ ही उपाधी त्यांना चिकटली ती कायमचीच. त्यांच्या दावणीला ४० ते ५० बैल बांधले होते अशीही चर्चा त्यांच्याबाबत कायमच व्हायची. शर्यत जिंकली की गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर डान्स करण्याची त्यांची पद्धत ही त्यांची प्रसिद्ध होण्यासाठीचं मुख्य कारण ठरली.

पंढरी फडकेंना गोल्डमॅन का म्हटलं जायचं?

बैलगाडा शर्यत असली की पंढरी फडके गळ्यात सोन्याच्या माळा आणि हाता सोन्याची कडी घालून बैलगाड्यावरुन एकदम दिमाखदार एंट्री घेत. त्यांच्या शरीरावर इतकं सोनं असे की लोक त्यांच्याकडे बघत राहात. त्यामुळेच त्यांना गोल्डमॅन हे नाव चिकटलं ते कायमचंच.

हे पण वाचा- VIDEO: बैलगाडा शर्यत आली अंगलट! बैलानं थेट प्रेक्षकांवरच घेतली उडी; अनेक जण जखमी

नंबर वन बैलावर कायम असे नजर

पंढरीनाथ फडके जिंकणारा बैल मोठी किंमत देऊन खरेदी करत असत. एकदा त्यांनी ११ लाख रुपये देऊन जिंकलेला बैल खरेदी केला होता. बैल, बैलगाडा शर्यतीवर त्यांचं अतोनात प्रेम होतं. शर्यतीत पहिला नंबर येण्याचं सिक्रेट म्हणजे व्यायाम, वेळच्या वेळी खाद्य आणि निगा राखणं. बैलांना खाद्यात शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असत.