मुंबई : बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरी केंद्रित करण्यासाठी १७ वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी २ हजार ६६८ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.

काळानुसार कृषी विभागाची गरज, मागणी बदलली आहे. हवामान बदल, बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक पद्धती आणि पीक व्यवस्थापन बदलले आहे. नव्याने निर्माण झालेली गरज पूर्ण होण्याची आणि कालबाह्य झालेली पदे रद्द करण्याची गरज होती. त्यानुसार नव्या आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २ हजार ६६८ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.

कालबाह्य झालेली काही पदे रद्द करून आणि काही पदांमध्ये कपात करून हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे ९२.६० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकाऱ्यांना गट अ दर्जा आणि एस १९ वेतनश्रेणी देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कृषी विभाग अधिक गतिमान, आधुनिक आणि शेतकरीकेंद्रित होण्यास मोठी मदत होणार आहे.

चार नव्या संचालनालयास मंजुरी

शेतकऱ्यांना मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे मिळावे यासाठी कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांसह विविध स्तरांवरील पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच कृषी यांत्रिकीकरण, मालमत्ता व्यवस्थापन, ॲग्रीस्टॅक आणि ‘हवामान अनुकूल व शाश्वत शेती, असे चार नवे संचालनालयांना मान्यता देऊन ९८ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅकचे काम गतिमान करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.

हवामान बदल पूरक शेतीवर भर

कृषी विभागातील कालबाह्य झालेली पदे रद्द करून गरजेनुसार नवी चार संचालनालये आणि पदे मंजूर केली आहेत. हवामान बदल पूरक शेती, कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी यांत्रिकीकरणावर भविष्यात भर राहील. विभागाच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता, पारदर्शकता, कार्यक्षमता येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.