मुंबई : सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) १८ कोटींचे कर्ज घेण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी आमदार पवार यांनी चालविण्यास घेतला असून मागील गळीत हंगामापासून हा कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले आहे. पवार हे त्यांच्या विश्वासातले मानले जातात. या कारखान्यास सरकारने यापूर्वीच गाळप क्षमता दुप्पट करण्यासाठी १८ कोटींचे शेअर कॅपिटल दिले असून आता पुन्हा एकदा राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज मिळावे यासाठीचा प्रस्ताव कारखान्याने साखर आयुक्तांना सादर केला होता.
सहकार, वित्त विभागाचा विरोध हा कारखाना गेली काही वर्षे बंद असल्याने तसेच एनसीडीसीच्या कर्जासाठीच्या निकषात बसत नसल्याचे सांगत सहकार आणि वित्त विभागाने या कारखान्यास शासनहमीवर कर्ज देण्यास तसेच त्याबाबतचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यास विरोध दर्शविल्याचे समजते. मात्र आता हा कारखाना सुरू झाला असून कारखान्याच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून व हे पूर्व उदाहरण म्हणून गृहीत धरले जाणार नाही आणि फक्त एकवेळचे उदाहरण म्हणून गृहीत धरण्यात येईल या अटीवर मंत्रिमंडळाने या कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून कर्ज घेण्यास मान्यता दिली. त्यानुसार कारखान्याचा १८ कोटी ९ हजार रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
