Maharashtra Cabinet Expansion News, 09August 2022: गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच विरोध दर्शवला असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.

muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Live Updates

Maharashtra Mantrimandal Vistar 2022 Updates: देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आणि विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता छोटेखानी विस्तार करण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठींचा निर्णय

13:09 (IST) 9 Aug 2022
राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मंत्रीमंडळ विस्तारात सर्वात आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमध्ये कार्यकर्त्यानी जल्लोष केला. यावेळी लोणीमधील कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष करून गुलालाची उधळण केली. तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच विखे पाटलांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.

12:58 (IST) 9 Aug 2022
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा."

https://twitter.com/narendramodi/status/1556903586898010112

12:52 (IST) 9 Aug 2022
“ते टाळलं असतं तर बरं झालं असतं”, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्ताराला राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. "ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ज्यांना अद्याप क्लीन चिट मिळाली नाही त्यांना टाळलं असतं तर बरं झालं असतं," असं मत पवारांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (९ ऑगस्ट) एबीपी माझाशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

12:44 (IST) 9 Aug 2022
"संजय राठोड यांनी मंत्रीपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा"

संजय राठोड यांनी मंत्रीपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असून, चित्रा वाघ यांची टीका वैयक्तिक असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. आपण दुप्पट वेगाने काम करु असंही ते म्हणाले आहेत.

12:37 (IST) 9 Aug 2022
हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रीमंडळ आहे का ?

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याकडे लक्ष वेधतानाच शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का ? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

राज्य मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल याकडेही लक्ष वेधले आहे.

12:33 (IST) 9 Aug 2022
इम्तियाज जलील यांनी ट्वीट केला किरीट सोमय्यांचा व्हिडीओ

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या संजय राठोड यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

12:25 (IST) 9 Aug 2022
राज्याच्या स्त्री-शक्तीवर अन्याय - सुप्रिया सुळे

स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

12:24 (IST) 9 Aug 2022
....म्हणून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान - एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

12:12 (IST) 9 Aug 2022
पंकजा मुंडे यांचं ट्विट

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं असून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

12:05 (IST) 9 Aug 2022
काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं - अजित पवार

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली असून काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं आहे. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. ज्यांना क्लीनचीट मिळालेली नाही त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं ते म्हणाले.

12:04 (IST) 9 Aug 2022
शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं

शिंदे गटाकडून -

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.

12:00 (IST) 9 Aug 2022
मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान

मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. १९९५ पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. बिल्डर म्हणूनही त्यांची ओळख आहे.

11:59 (IST) 9 Aug 2022
शंभूराज देसाईंना शपथ

शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री म्हणून त्यांनी याआधी काम केलं आहे.

11:55 (IST) 9 Aug 2022
अतुल सावे यांना संधी

२०१४ पासून आमदार असणारे अतुल सावे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी याआधी अनेक खाती सांभाळली आहेत.

11:53 (IST) 9 Aug 2022
दीपक केसरकर यांनी घेतली शपथ

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सध्या त्यांच्यावर शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.

11:50 (IST) 9 Aug 2022
अब्दुल सत्तार यांना अखेर संधी

अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असून या पार्श्वभूमीवर त्यांचा पत्ता कट केला जाईल असं बोललं जात होतं. अब्दुल सत्तार २००९ पासून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.

11:47 (IST) 9 Aug 2022
रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदाची शपथ

रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००९ पासून ते आमदार आहेत. कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव आहे.

11:44 (IST) 9 Aug 2022
तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची शपथ

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. २०१९ मध्ये मंत्रीपदाची संधी हुकल्यानं ते नाराज होते.

11:43 (IST) 9 Aug 2022
उदय सामंत यांना मंत्रीपदाची शपथ

उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता ते शिंदे गटाच्या पाठीशी आहेत. गेल्या सरकारमध्ये त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

11:41 (IST) 9 Aug 2022
वाद, गंभीर आरोपांनंतरही अब्दुल सत्तार, संजय राठोडांना संधी, शिंदे गटातून कोणत्या नऊजणांना संधी? वाचा…

शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटातून एकूण नऊजणांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे यात टीईटी घोटाळ्याचे आरोप झालेले अब्दुल सत्तार आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोप झालेल्या संजय राठोड यांचाही समावेश आहे.

सविस्तर बातमी...

11:41 (IST) 9 Aug 2022
संदीपान भुमरे यांनी घेतली शपथ

सलग पाचवेळा आमदार राहिलेल्या संदीपान भुमरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

11:38 (IST) 9 Aug 2022
सुरेश खाडे यांनी घेतली शपथ

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते सुरेश खाडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे. २००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

11:35 (IST) 9 Aug 2022
संजय राठोड यांना संधी, घेतली शपथ

संजय राठोड यांना संधी देण्यात आली असून शपथ घेतली आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्याने त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने त्यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं होतं. संजय राठोड यांचा समावेश केल्याने भाजपामधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

11:33 (IST) 9 Aug 2022
दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली

दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४ पासून सलग आमदार असणाऱ्या दादा भुसे यांना कृषी खात्याचा अनुभव आहे.

11:32 (IST) 9 Aug 2022
गुलाबराव पाटील यांनी घेतली शपथ

जळगाव मतदारंघातील आमदार गुलाबराव पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जबाबदारी होती. एकनाथ शिंदेंना सर्वात प्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील होते.

11:29 (IST) 9 Aug 2022
गिरीश महाजन यांनाही संधी

गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. ते सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बंदूक दाखवल्याने वाद निर्माण झाला होता.

11:27 (IST) 9 Aug 2022
विजयकुमार गावीत यांनी घेतली शपथ

विजयकुमार गावीत यांनी शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी मराठीत त्यांचं अभिनंदन केलं.

11:23 (IST) 9 Aug 2022
चंद्रकांत पाटील यांनी घेतली शपथ

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे.

11:23 (IST) 9 Aug 2022
सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली

सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली आहे. अर्थमंत्री, वनमंत्री अशी खाती याआधी त्यांनी सांभाळली आहेत.

11:23 (IST) 9 Aug 2022
राधाकृष्ण विखे पाटलांनी सर्वात प्रथम घेतली शपथ

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. भाजपाकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोन करुन मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं सांगण्यात आलं होतं. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनुभवी नेत्याचा समावेश झाला आहे.

11:04 (IST) 9 Aug 2022
शपथविधीला सुरुवात

गेल्या महिन्याभरापासून प्रतिक्षा असलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडत आहे. राजभवनात शपथविधीला सुरुवात झाली आहे.

11:01 (IST) 9 Aug 2022
मी नाराज नाही - संजय शिरसाट

एकनाथ शिंदेंनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नाराज होण्यासारखं काही नाही. प्राथमिकतेनुसार संधी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सर्वांशी संवाद साधला असून भविष्यात कशा पद्दतीने काम करायचं आहे याबद्ल सांगितलं. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात काम केलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

10:51 (IST) 9 Aug 2022
एकनाथ शिंदेंसोबतची आमदारांची बैठक संपली

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आमदारांसोबत बाहेर आले आहेत. यावेळी नाराज असल्याची चर्चा असणारे संजय शिरसाटदेखील सोबत आहेत. सर्व आमदार राजभवनाच्या दिशेने निघाले असून काहीच वेळात शपथविधी पार पडणार आहे.

10:36 (IST) 9 Aug 2022
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे -

राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, विजय गावीत, गुलाबराव पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण, संजय राठोड, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, दादा भुसे, तानाजी सामंत आज शपथ घेणार आहेत.

10:34 (IST) 9 Aug 2022
राजभवनात जोरदार तयारी, नेते पोहोचण्यास सुरुवात

राजभवनात जोरदार तयारी करण्यात आली असून नेते पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. थोड्याचे वळात मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात होणार आहे.

10:29 (IST) 9 Aug 2022
भाजपामध्ये कोणतीही नाराजी नाही, दानवेंचा दावा

भाजपामध्ये कोणतीही नाराजी नाही. नेतृत्व जो निर्णय घेतं, तो आम्हाला मान्य असतो. निमंत्रणं पाठवण्यात आली असून, संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मागे केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही ते म्हणाले आहेत.

10:26 (IST) 9 Aug 2022
सह्याद्री गेस्ट हाऊसवर शिंदे गटातील नेत्यांची बैठक

सह्याद्री गेस्ट हाऊसवर शिंदे गटातील नेत्यांची बैठक

10:16 (IST) 9 Aug 2022
शिवेसना-भाजपाचा कर्मठ कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही - आशिष शेलार

संधी न मिळाल्याने शिवेसना-भाजपाचा कर्मठ कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. आज ९ ऑगस्टलाच मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने 'भारत छोडो'च्या प्रेरणेने शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रीमंडळ भ्रष्टाचाराला गाढून टाकेल आणि विकासाची गंगा पुढे घेऊन जाईल असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

10:10 (IST) 9 Aug 2022
शिंदे समर्थक संजय शिरसाट प्रचंड नाराज?

संजय शिरसाट मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संजय शिरसाट यांनी नाराजी जाहीर केली असून, यावेळी खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अंतिम यादीत संजय शिरसाट यांचं नाव असेल की नाही हे पहावं लागणार आहे.

10:07 (IST) 9 Aug 2022
जुन्या नेत्यांना संधी देणं योग्य निर्णय- शहाजीबापू पाटील

जुन्या नेत्यांना संधी देणं योग्य निर्णय आहे. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. गुवाहीमधील बैठकीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो आनंदाने मान्य करु असं सर्वांनी सांगितलं होतं. नवीन आमदार अजिबात नाराज नाहीत असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.

09:57 (IST) 9 Aug 2022
मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान

पुन्हा संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला असून, ही मोठी जबाबदारी आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींसारखं सक्षम नेतृत्व पक्षाकडे असून, विश्वनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ज्या गतीने देशाची प्रगती होत आहे, तशीच राज्याची होईल. सर्व आव्हानांना आम्ही सामोरे जाऊ. फडणवीसांचा अनुभव पाहता आणि शिंदे यांच्या साथीने आम्ही सर्व अडचणींवर मात करु असंही ते म्हणाले आहेत.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीकडून राज्याची अधोगती झाली असून, आता जनतेचं सरकार आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

09:50 (IST) 9 Aug 2022
शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा

राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ३९ दिवसांपासून राज्याचं मंत्रालय सचिवालय झालं आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे अशी इच्छा आहे असा टोला एबीपी माझाशी बोलताना लगावला आहे. ज्यांना मंत्रिमंडळात तापुरती संधी मिळेल ती लखलाभ असो असंही ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

09:46 (IST) 9 Aug 2022
संजय राठोड यांचा पत्ता कट?

संजय राठोड आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. मात्र या बैठकीनंतर निघताना त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. यामुळे मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला.

09:45 (IST) 9 Aug 2022
मला अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास - बच्चू कडू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ असं ते म्हणाले होते. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

09:42 (IST) 9 Aug 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला सुरुवात झाली असून आमदार पोहोचले आहेत.

09:39 (IST) 9 Aug 2022
"एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य"

एकनाथ शिंदे आम्हाला जे मंत्री शपथ घेतील त्यांची नावं सांगतील. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबद्दल विचारलं असता, आपल्याला जास्त माहिती नसल्याचं ते म्हणाले आहेत.

09:38 (IST) 9 Aug 2022
Maharashtra Cabinet Expansion: भाजपाला २४, तर शिंदे गटाला १८ मंत्रिपदे?

* सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढील कायदेशीर प्रश्न संपुष्टात येईपर्यंत मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करू नये, असे भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरविले आहे.

* त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपच्या १२-१३ आणि शिंदे गटाच्या ९-१० मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाटय़ाला एकूण २४ तर शिंदे गटाला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

* पण, मंगळवारच्या विस्तारानंतर काही महिन्यांनी उर्वरित जागा भरल्या जातील. तोपर्यंत भाजप आणि विशेषत: शिंदे गटातील इच्छुकांना मंत्रिपदाच्या आशेवर ठेवण्यात येईल, असे दिसते.

फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्र्यांची यादी निश्चित केली असून, या नेत्यांना दूरध्वनीवरुन निरोप देण्याचे काम दिवसभर सुरू होते. भाजपकडून अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. मुंबई-ठाण्यातील नेत्यांना सोमवारी रात्री उशिरा निरोप देण्यात येत होते. अ‍ॅड. आशिष शेलार यांना पुढील काळात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.