scorecardresearch

“संजय राठोडांची आरती करा म्हणजे…”; पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप

संजय राठोड यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आल्याने शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे

“संजय राठोडांची आरती करा म्हणजे…”; पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप
प्रसारमाध्यमांशी बोलताना केली टीका

“या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल”, अशा शब्दांमध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलेलं असतानाच ज्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे हा वाद निर्माण झालाय त्या पूजाच्या आजीनेच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

नक्की पाहा >> Photos: “…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला”; पूजा चव्हाण प्रकरणावरुन टीकेच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा खुलासा

पूजा चव्हाण या तरुणीची आजी शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही. ज्या पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं आहे हे दुर्दैवी बाब आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे,” असं शांताबाई यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

तसेच, “खरं तर एका मुलीची अब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढं ऐकूनसुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो. आरती करावी त्याची या (शिंदे-फडणवीस) सरकारने. त्याची पूजा करा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल,” असा टोलाही शांताबाई यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले; बंगल्यातून बाहेर पडताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “अरे बाबा…”

“हा (राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय) महिलांचा अपमानच आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खुनी आहे खुनीच राहणार,” अशी टीकाही शांताबाई यांनी केली.

नक्की वाचा >> संजय राठोड यांना मंत्रीपद : “लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची…”; महिला सामाजिक कार्यकर्त्याची पोस्ट चर्चेत

तुमची मागणी काय आहे? तुम्ही काय करणार आहात? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता शांताबाई यांनी, “पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या