मुंबई : राज्यातील बारा जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संबंधित जिल्ह्यातील मंत्री निवडणूक प्रचारात अडकून राहिल्यामुळे आणि प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमासाठी गेलेले काही पालकमंत्री वेळेत मुंबईत पोहचू न शकल्यामुळे फक्त एकवीस मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासह तेरा मंत्र्यांनी दांडी मारली.

राज्यात सतरा जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्हा परिषदांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणीतही निवडणुका होत आहे आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील मात्तबर राजकीय नेते, मंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम येथे आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर येथील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमासाठी गेल्यामुळे मंगळवारी त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी वेळेत उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्र्यांसह फक्त २१ मंत्री हजर होते, तर तेरा मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारणारे मंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पणन मंत्री जयकुमार रावल, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजानिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर आदी मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली. 

 मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित असणारे मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी, कोकण खोरे) गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री  मंगल प्रभात लोढा, पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. उर्वरित सर्व मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.