​सावंतवाडी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६’ ही भव्य स्पर्धा २९ व ३० जानेवारी रोजी मुंबईत रंगणार आहे. दादर (पूर्व) येथील श्री हालारी ओसवाल समाज हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून, कॅरम शौकिनांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

​ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही खेळाडूंसाठी खुल्या गटात खेळवली जाईल. पारितोषिकांचे स्वरूप ​विजेता १ लाख ५० हजार रुपये व चषक.​उपविजेता १ लाख रुपये व चषक.​तृतीय क्रमांक ७५ हजार रुपये व चषक.​चतुर्थ क्रमांक ५० हजार रुपये.उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, तर त्यापूर्वीच्या फेऱ्यांमधील कामगिरीनुसार ५ ते १० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ​तसेच, पहिल्या फेरीपासून ‘व्हाईट स्लॅम’ आणि ‘ब्लॅक स्लॅम’ करणाऱ्या खेळाडूंना १ ते २ हजार रुपयांचे विशेष रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

​महिला खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी आयोजकांनी विशेष अतिरिक्त बक्षिसे जाहीर केली आहेत. यामध्ये दुसऱ्या फेरीपासून सहाव्या फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महिला खेळाडूंना १ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त रोख इनाम दिले जाणार आहे. हे सामने ‘सिस्का’ कंपनीच्या शुअर स्लॅम बोर्ड आणि बुलेट शॉट सोंगट्यांवर खेळवले जातील.सहभागी खेळाडूंना असोसिएशनतर्फे गणवेश दिला जाईल, श्री हालारी ओसवाल समाज हॉल (वातानुकूलित), रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व) हे स्पर्धेचे स्थळ आहे.

​स्पर्धा सर्वांसाठी खुली असली तरी प्रवेशासाठी मर्यादा ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी आपापल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरूण केदार यांनी केले आहे.
​