मुंबई : हवामान बदलाचा फटका म्हणून देशाच्या काजू उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे देशाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्चा काजू निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. देशातील एकूण काजू प्रक्रिया उद्योगापैकी ४० टक्के उद्योग महाराष्ट्रात असल्यामुळे मोठा फटका राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला बसणार आहे.

हवामान बदलाचा परिणाम म्हणून यंदा मोसमी पाऊस लांबला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोसमी पाऊस लांबला. संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे काजूचा मोहोर गळून गेला. उर्वरीत मोहोर बुरशी आणि अति आर्द्रतेमुळे कुजून गेला. त्यानंतरही अनेक टप्यात मोहोर आला. पण, अति थंडी, दुपारचे वाढलेले तापमान, बुरशी आणि तुडतुड्यांमुळे फळधारणा झाली नाही. एकूण काजू उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.

देशांतर्गत काजू उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज असतानाच देशाला दर्जेदार कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या घाना, आयव्हरी कोस्ट, बेनिन, टांझानिया सारख्या प्रमुख आफ्रिकी देशांनी देशांतर्गत काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी कच्च्या काजूच्या निर्यातीव निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला काजूचा मोठा तुटवडा जाणवेल, असा अंदाज आहे.

काजू उद्योगाची गणित कोलमडणार

महाराष्ट्रासह देशातील काजू उद्योगाची एकूण काजू प्रक्रिया क्षमता सुमारे १६ लाख टन इतकी आहे. त्यापैकी निम्मा काजू देशात उत्पादित होणारा तर निम्मा आयात केलेला असतो. यंदा देशांतर्गत काजू उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. तर प्रमुख आफ्रिकी निर्यातदार देशांना कच्च्या काजूच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया केंद्रांना काजूचा तुटवडा जाणविणार आहे.

देशाच्या एकूण काजू प्रक्रिया क्षमतेपैकी ४० टक्के काजू प्रक्रिया उद्योग राज्यात होते. त्यामुळे राज्यातील काजू प्रक्रिया केंद्रे अडचणीत येणार आहेत. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने या संभाव्य संकटाची दखल घेतली आहे. काजू मंडळ दीर्घकालीन उपाययोजना हाती घेणार आहे. नैसर्गिक, सेंद्रीय शेतीद्वारे काजूच्या झाडांची रोग प्रतिकारक क्षमता, उत्पादन क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात कोकणातूनच करावी लागणार आहे. शिवाय कच्च्या काजूचा पुरवठा सुरळित होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र काजू मंडळाचे तज्ज्ञ संचालक डॉ. परशराम पाटील यांनी दिली.

गणेशोत्सवापर्यंत पुरेल, दिवाळीत टंचाई

यंदा कोकणात कच्च्या काजू बियांची खरेदी १७० ते १८० रुपयांनी सुरू आहे. कच्च्या काजू बियांणा मिळालेला आजवरचा सर्वाधिक दर आहे. काजूच्या उत्पादनात मोठा घट झाल्यामुळे प्रक्रिया केंद्रांना काजूचा तुटवडा भासेल. प्रक्रिया केंद्रांना स्थानिक काजू गणेशोत्सवापर्यंत पुरेल. तोपर्यंत आफ्रिकी देशांतून काजू आला नाहीतर तुटवडा जाणवेल. यंदा दिवाळीच्या काळाता काजूचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. काजूचे दर १५०० रुपये किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

राज्य सरकारने कोकणातील काजू उत्पादकांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा फटका बसत आहे. काजू क्षेत्रवाढ, उत्पादन वाढीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. काजू मंडळावर राजकीय नेत्यांची वर्णी लावून मंडळाचे राजकीयकरण करण्याऐवजी मंडळ अधिक स्वायत्त आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे, अशी मागणी सिंधूदुर्ग जिल्हा शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केली आहे.

देशाचा काजू उद्योग

  • देशाची एकूण काजू प्रक्रिया क्षमता – १२ लाख टन
  • देशांतर्गत एकूण उत्पादन – सुमारे सहा लाख टन
  • आफ्रिका आणि आग्नेय आशियातून होणारी आयात – सुमारे सहा लाख टन
  • आफ्रिकेतील घाना, घाना, आयव्हरी कोस्ट, बेनिन, टांझानिया या देशांनी कच्च्या काजूच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले
  • कोल्लम (केरळ) शहराला जगाची काजू राजधानी म्हटले जाते.