महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये शोभायात्रा निघाल्या आहेत. या शोभायात्रांचा मोठा उत्साह पाहण्यास मिळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथील शोभायात्रेत सहभागी झाले होते. अभिनेत्री सई ताम्हणकरही यावर्षी नागपूरच्या शोभायात्रेत सहभागी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला आणि सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मी सर्व हिंदूंना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो. नागपूरमध्ये अतिशय चांगली शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे. पारंपारिक वेशभुषेत माता, भगिनी, मुलं पाहण्यास मिळतात. साहसी खेळ सादर केले जातात. एक मोठा आनंद साजरा झालेला पाहण्यास मिळतो. त्यामुळे मी दरवर्षी या शोभायात्रेत येत असतो. इथली भव्यता पाहण्यास मिळते आहे. नागपूरचा सगळा भाग भगवा झालेला पाहण्यास मिळतो.

महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हाच नव्या वर्षाचा संकल्प

मला शोभायात्रेत सहभागी होऊन आनंद झाला आहे. विकास आणि विरासत हे मोदीजी कायम सांगत असतात. विरासत म्हणजे आपली संस्कृती. आधुनिकता जपत असताना संस्कृतीही सांभाळायची असते. नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर तिथल्या मंचावरुन मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं?

दरवर्षीप्रमाणे आज आपण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक मराठी माणसासाठी हिंदू माणसासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून आपले नवे संकल्प आपण सुरु करत असतो. नवीन आशा, नवीन पहाट घेऊन आपण आयुष्याला सामोरे जात असतो. दरवर्षी अतिशय सुंदर अशी शोभायात्रा आयोजित करत असते. सगळेजण या ठिकाणी पारंपारिक वेशात येऊन शोभायात्रेला मंगलमय बनवतात. जय श्रीराम चे नारे दुमदुमताना पाहण्यास असतील. दोरीवरचा मल्लखांब करणाऱ्या आपल्या छोट्या बहिणी, ढोल पथकं या सगळ्यांनी सुंदर कार्यक्रम यशस्वी केला आहे. मी सगळ्यांचं कौतुक करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जी गुढी उभारण्यात आली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाची गुढी आहे. ती अशीच उंच उंच होत राहो या शुभेच्छा मी तुम्हाला देतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी छोट्याश्या भाषणात स्पष्ट केलं.