मुंबई : भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या स्वगणनेला राज्यातून थंड प्रतिसाद असून आतापर्यंत केवळ ४ लाख ७१ हजार जणांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना पूर्ण केली आहे. तर सिंधुदुर्ग येथील ४३ कुटुंबे असलेले ‘मुठ’ गाव स्वयं-गणना पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव ठरले आहे.

यंदा देशातील प्रत्येक व्यक्तीला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनापासून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. मात्र, ८ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ५ लाख ७५ हजार ७९३ व्यक्तींनी (म्हणजेच कुटुंब) स्व-गणनेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी फक्त ४ लाख ७१ हजार जणांनी माहिती अंतिम करून स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण २.४४ कोटींहून अधिक कुटुंबे होती. यामध्ये ग्रामीण भागात सुमारे १.३२ कोटी आणि शहरी भागात सुमारे १.१२ कोटी कुटुंबे होती. त्यावेळी महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी होती. २०११मधील कुटुंबसंख्येच्या आकडेवारीचा संदर्भ घेता, आतापर्यंत झालेली स्वगणना फारच अल्प आहे.

स्वगणनेत अवघ्या ३३ प्रश्नांसंबंधी माहिती घेण्यात येत आहे. अत्यंत सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया असूनही या मोहिमेला फारच कमी प्रतिसाद आहे. ऑनलाईन माहिती भरण्याची ही सोय १५ मेपर्यंत कार्यरत राहणार आहे. तसेच ऑनलाईन माहिती ऐच्छिक असून ती भरणे बंधनकारक नाही. १५ मे ते १४ जून दरम्यान जनगणना कार्य संचालनालयाचे प्रगणक घरोघरी जाऊन माहिती घेणारच आहेत. परंतु, ऑनलाईन नोंदणी असल्यास या कर्मचाऱ्यांचा माहिती भरून घेण्यासाठी लागणारा कुटुंबांचा आणि प्रगणकांचा वेळ वाचणार आहे.

जास्तीत जास्त कुटुंबांनी ऑनलाईन माहितीचा पर्याय निवडावा याकरिता राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर रितु तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतः ऑनलाईन माहिती भरून स्वगणनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. मात्र या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

स्वगणना करताना घ्यावयाची काळजी

नागरिकांनी स्वगणना करताना https://se.census.gov.in या अधिकृत युआरएल संकेतस्थळावरच नोंद करावी.जनगणनेसंबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात ‘RGICEN’ हा कीवर्ड असतो. उदा. AD-RGICEN-S, BDRGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.

माहिती गोपनीय आणि सुरक्षित

ही माहिती जनगणना कायद्यानुसार घेतली जाते. ती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाते. आयकर, पोलीस यंत्रणांद्वारे किंवा कोणत्याही तपासात या माहितीचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे ती न्यायालयात साक्ष किंवा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही. तसेच ती माहितीच्या अधिकाराखालीही मिळवता येत नाही.

अवघ्या १५-२० मिनिटांचे काम

घरातील कोणताही एक सदस्य अवघ्या १५ ते २० मिनिटात स्वगणना पूर्ण करून कुटुंबाचा तपशील नोंदवू शकतो आणि नोंदणीकृत भ्रमणध्वनी नंबर किंवा ईमेलवर स्वगणना आयडी प्राप्त करू शकतो. यात कुठलीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही. नागरिकांनी प्राप्त होणारा मोबाईल संदेश किंवा ईमेलचा स्त्रोत योग्य असल्याची खात्री करावी. याबाबत आलेल्या इतर संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये. – संतोष पायस, उपसंचालक, जनगणना कार्य संचालनालय.

‘मुठ’ गाव स्वयं-गणना पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मुठ’ गावात एकूण ३६ घरे आणि ४३ कुटुंबे असून, गावाची लोकसंख्या १४४ इतकी आहे. गावातील सर्व कुटुंबांनी स्वयं-गणना प्रक्रियेत प्रशासनाच्या पुढाकाराने अचूक माहिती सादर केली.