पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठीच्या निविदा केवळ एकाच उद्योग समूहाच्या सहा कंपन्यांना देण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी केला. सीईटी सेलचे अधिकारी आणि या कंपन्यांचे प्रतिनिधी संगनमताने खासगी विद्यापीठांना अनुकूल वेळापत्रक ठरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, कुलकर्णी यांनी केलेले आरोप अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट करत सीईटी सेलने आरोप फेटाळले.

कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सीईटी सेलच्या कारभाराबाबत आरोप केले. ‘गेल्या पाच वर्षांत सीईटी सेलने परीक्षा, संबंधित कामांसाठी ६९९ कोटी रुपये खर्च केले. हा खर्च विद्यार्थ्यांकडून शुल्काद्वारे वसूल केला जातो. २०२१ ते २०२५ या कालावधीत सामायिक प्रवेश परीक्षेसाठीच्या (सीईटी) निविदा केवळ निटकॉन, एज्युस्पार्क आणि स्किल ट्री या कंपन्यांनाच देण्यात आल्या. तर, इंडस एज्युट्रेन, अल्ट्रोरॅप्रो इन्फ्रास्ट्रक्चर, लीडस्पायर कन्सल्टिंग या कंपन्यांना काही कामे देण्यात आली.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही दरवर्षी सरकारी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया लांबत असल्याचे चित्र आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी परीक्षा होत नाहीत. त्यामुळे व्यावसायिक महाविद्यालयांचे वेळापत्रक कोलमडते. सीईटी सेलचे अधिकारी आणि या कंपन्यांचे प्रतिनिधी संगनमताने खासगी विद्यापीठांना अनुकूल असे वेळापत्रक ठरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,’ असा आरोप कुलकर्णी यांनी केला.

‘सीईटीच्या कामांची निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने पार पडणे गरजेचे आहे. मात्र, एकाच उद्योगसमूहाला सीईटीची कामे मिळतील, असे निकष तयार केले जातात. हे निकष पूर्ण करूनही २०२१ मध्ये टीसीएस आणि आयटीआय या कंपन्यांना काम मिळाले नाही. तर निकषांमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या एज्युस्पार्कला काम देण्यात आले. निविदा प्रक्रियेत गैरकारभार होत आहे. त्यातून विद्यार्थ्यांची लूट होत आहे,’ असा आरोप त्यांनी केला. सीईटी सेलच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही संवाद साधला. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी आरोपांबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

सीईटी सेलचे स्पष्टीकरण

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेणे, त्यांचे निकाल जाहीर करणे आणि प्रवेश प्रक्रिया करणे या सर्व बाबींसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या कंपन्यांना परीक्षांचे काम देण्यात आले. ही निविदा प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली आहे.

निटकॉन, एज्युस्पार्क आणि स्किल ट्री या स्वतंत्र कंपन्या असून, त्यातील दिल्ली येथील निटकॉन ही कंपनी सार्वजनिक मालकीची, तर एज्युस्पार्क आणि स्किल ट्री या खासगी कंपन्या आहेत. काही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राष्ट्रीय स्तरावरील एआयसीटीई, मेडिकल कौन्सिलिन कमिटी आणि इतर नियामक मंडळ हे ठरवतात. त्यांचे नियम, निर्देशांनुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. अपुऱ्या माहितीच्या आधारे सीईटी सेलवर केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे सीईटी सेलने स्पष्ट केले.