पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या मुलींची संख्या वाढत असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी सेल) असलेल्या माहितीचे विश्लेषण सांगते. आकडेवारीनुसार, मुलींच्या वाढत्या नोंदणीमुळे मुले आणि मुली यांच्या नोंदणीतील तफावत आता १५ वरून ३.५ टक्क्यांपर्यंत आली. यामुळे राज्यातील व्यावसायिक शिक्षणातील स्त्री-पुरुष लिंगभेद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मात्र, मुलींचे वाढलेले प्रवेश जोवर नोकरी करणार्यांच्या संख्येत रूपांतरित होत नाहीत, तोवर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे म्हणणे धाडसाचे ठरेल, असे समाजशास्त्रज्ञ सांगतात.
२०२४-२५मध्ये मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील मुलींचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असलेला ओढा लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसते. राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल राबविते. त्यासाठी १८हून अधिक प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटी सेलच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत मुलींच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. २०२१-२२मध्ये मुलगे आणि मुली यांच्या नोंदणीतील तफावत १५.८३ टक्के होती. ती २०२६-२७मध्ये ३.५२ टक्क्यांपर्यंत कमी झाली. व्यावसायिक शिक्षणातील आर्थिक अडचणी मोफत शिक्षण योजनेच्या माध्यमातून बर्याच अंशी कमी झाल्यामुळे राज्यातील मुलींचा उच्च शिक्षणातील वाढता सहभाग, व्यावसायिक शिक्षणाकडे वाढता कल अधोरेखित होत आहे.
‘जात, पुरुषसत्ता यांच्या बेड्या मुली, महिलांना पिढ्यान् पिढ्या मागे खेचत होत्या. सरकारी योजना गंभीरपणे राबवल्यास व्यवस्थात्मक विषमता दूर करता येते, हे मुलींसाठीच्या मोफत शिक्षण योजनेच्या माध्यमातून दिसून येते,’ असे निरीक्षण समाजशास्त्र आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक प्रा. श्रुती तांबे यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या, ‘दहावी, बारावीपासून ‘यूपीएससी’पर्यंतच्या निकालात मुली बाजी मारतात. मिळालेल्या संधीचे सोने करतात, हे आजवर सिद्ध झाले आहे. मुली आता मोठ्या प्रमाणात केवळ उच्च शिक्षणाकडे येत आहेत, असे नाही, तर विशेष व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेत आहेत.
‘अलीकडे लग्न जमवतानाही मुलगी शिकलेली असणे महत्त्वाचे झाले असल्यानेही टक्का वाढला असेल. तथापि मुलींनी केवळ शिकणे नाही, तर व्यावसायिक क्षेत्रात काम करणे, विशेषत: लग्नानंतरही काम करत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. ते होणे मात्र आजही कठीण दिसते,’ असेही तांबे यांनी नमूद केले.
अशी कमी झाली तफावत
वर्ष एकूण नोंदणी मुलगे मुली तफावत
२०२१-२२ ५,७७,४५६ ३,३४,४२९ २,४३,०२७ १५.८३ टक्के
२०२२-२३ ५,६४,२५६ ३,१३,६५९ २,५०,५९७ ११.१८ टक्के
२०२३-२४ ५,९५,८१६ ३,३५,४२५ २,६०,३९१ १२.५ टक्के
२०२४-२५ १३,०२,४४६ ६,८९,०४३ ६,१३,४०३ ५.८१ टक्के
२०२५-२६ १४,०७,९७४ ७,३०,५६७ ६,७७,४०७ ३.७८ टक्के
२०२६-२७ १८,१२,४९० ९,३८,१६२ ८,७४,३२८ ३.५२ टक्के
‘सीईटी’च्या दोन संधींचा परिणाम
‘सीईटी सेल’तर्फे घेतल्या जाणार्या प्रवेश परीक्षांमध्ये काही परीक्षा दोनदा घेतल्या जातात. त्यात एमबीए, एमएचटी-सीईटी अशा काही परीक्षांचा समावेश आहे. एकूण आकडेवारीमध्ये दोन वेळा घेतल्या जाणार्या परीक्षांच्या नोंदणीचाही समावेश आहे. परिणामी, सीईटी सेलच्या प्रवेश परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता १८ लाखांवर पोहोचली आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहण्याचा अडथळा मोफत शिक्षण योजनेमुळे दूर झाला. मुलींची नोंदणी वाढल्यामुळे मुलींचा, त्यांच्या पालकांचा व्यावसायिक शिक्षणावरील विश्वास अधोरेखित होतो. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांकडे मुलींचा कल वाढतो आहे. – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री
