बारामती : पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. ज्येष्ठ नेतेही प्रचारात उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून प्रचारात निधी आणि पैसा हाच मुद्दा आणला जात असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.

पुढील दोन वर्षांत ‘एक कोटी लखपती दीदी’ उभे करण्याचे काम सरकारने हाती घेतले असे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ातील सभांमध्ये नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवडय़ात बारामतीमधील प्रचार सभांमध्ये ‘मते द्या, निधी घ्या,’ असे वक्तव्य केले होते. २ डिसेंबरला पालिकांसाठी मतदान होत असल्याने शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगूर येथील सभेत मतदारांना १ डिसेंबरला घराबाहेर झोपण्याचा सल्ला दिला. विधानसभा निवडणुकीआधी जशी लक्ष्मी आली होती, तशी आताही येणार असल्याचे कारण त्यांनी त्यासाठी दिले.  मतांसाठी ‘अर्थकारण’ आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन चांगला नाही,’ अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी केली.

केवळ लाडकी बहीण नाही तर लखपती दीदीचे निम्मे उद्दिष्ट या वर्षीच पूर्ण केले जाईल.  येत्या काळात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नऊ गंभीर आजारांसाठी ३५ लाख रुपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कमळाची चिंता करावी, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

शिंदे यांचा उद्योगमंत्र्यांना सभेतून दूरध्वनी

अकोला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेमधूनच थेट उद्योगमंत्र्यांशी संपर्क साधला. रोजगारनिर्मितीसाठी मालेगाव येथे मोठा उद्योग आणण्याची सूचना शिंदे यांनी या वेळी केली. वाशीम जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे सभा आयोजित केली होती. नगरपालिकेला पाणीपुरवठा योजनेसाठी नगरविकास विभागाने ६५ कोटी रुपये दिले आहेत. शहरात चांगले रस्ते व्हावेत यासाठीदेखील निधी देऊ असे त्यांनी नमूद केले.

सध्या मते मागताना निधीचे वाटप केले जात आहे. त्यासाठी चढाओढ सुरू आहे. विकासकामांच्या जोरावर मते मागितली जात नाहीत, ही गोष्ट चांगली नाही. -शरद पवार, ज्येष्ठ नेते

तुम्ही २ डिसेंबर रोजी आमची काळजी घ्या, आम्ही पुढची पाच वर्षे तुमची काळजी घेऊ. –देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री