मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण; मदतीला पाठवलेल्या स्वत:च्या ताफ्यातील गाड्या

मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता येथे दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली.

Ashadha Ekadashi 2021 Pandharpur CM Help Injured
करंबक गावाजवळ झाला होता अपघात

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली. मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री या महापुजेसाठी भर पावसामध्ये स्वत: ड्राइव्हिंग करत सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. मात्र या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाईकस्वारांचा अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी या तरुणांना वाचवण्यासाठी तातडीची मदत पाठवल्याने या तरुणांचा प्राण वाचले.

झालं असं की, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले. रात्री नऊच्या सुमारास जवळजवळ आठ तासाच्या ड्रायव्हिंगनंतर मुख्यमंत्री सहकुटुंब पंढरपूरमध्ये दाखल झाले. मात्र या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता येथे दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक गाडी आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आणि रुगणवाहिकेमुळे अपघातग्रस्त तरुणांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. केवळ मदत न पाठवता पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या तरुणांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन तरुणांचे प्राण वाचले.

नक्की पाहा >> हेची दान देगा देवा! पहा शासकीय महापुजेचे खास फोटो; उद्धव ठाकरेंकडून मानाच्या दांपत्याला विशेष भेट

याच घटनेची सोशल नेटवर्किंगवर चर्चा असून शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्विट करुन याबद्दल माहिती देत मुख्यमंत्र्यांना संवेदनशील मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. “आतुरता पुन्हा विठ्ठल दर्शनाची… जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पंढरपूरला महापुजेसाठी जात असतांना करकंब गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुगणवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले… संवेदनशील मुख्यमंत्री,” असं गोऱ्हेंनी म्हटलं आहे.

तसेच आठ तासांचा लांबचा प्रवास करुन आल्यानंतर विश्रांती न घेता मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये करोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray in pandharpur sent ambulance from his convoy to help 2 injured people scsg

ताज्या बातम्या