तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला.

रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं.

आणखी वाचा- महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.

मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

आणखी वाचा- “पॅकेजवर माझा विश्वास नाही,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना मदतीचं आश्वासन

विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. “मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,” असंही ते म्हणाले.

मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, “मी येथील विरोधी पक्ष बोलतो तसा बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.

महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे, गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेच वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील केल्यानंतर मागील अनुभवातून आपल्याला शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील”. लसपुरवठा अद्यापही सुरळीत होत नसल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं,

कसा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
सकाळी १०.१० – वायरी, ता.मालवण येथे “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ – मोटारीने मालवण येथे आगमन व “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ – निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण