महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

“सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे”

करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला”.

“पॅकेजवर माझा विश्वास नाही,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना मदतीचं आश्वासन

“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

याआधी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं होतं. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं.

“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा

पुढे ते म्हणाले होते की, “लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असं विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray on lockdown extenstion covid 19 sgy