Maharashtra CM Uddhav Thackeray Resign: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्यांना पक्षाने मोठं केलं तेच विसरु लागलेत अशी खंत व्यक्त केली. लहानपणासून मी शिवेसना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेनेने चांगल्या मार्गावर आणलं. नगरेसवक, मंत्री, आमदार, खासदार झाले. माणसं मोठी झाली. मोठं केलं तेच विसरायला लागले अशी खंत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CM Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

“सरकार म्हणून आपण काय केलं, तर सुरुवातीलाच छत्रपतींच्या रायगडाला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. पीकविमा योजनेचं बीड पॅटर्न करून घेतलं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव ठेवलं होतं. ते नाव आपण आज दिलं आहे. उस्मानाबादला धाराशीव हे नाव दिलं आहे. वांद्रे वसाहतीतच सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड मंजूर केला आहे अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

SC Orders Floor Test Tomorrow: ठरलं! उद्याच ठाकरे सरकारची विश्वासदर्शक परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागते. कोणाची दृष्ट लागली हे तुम्ही जाणताच,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. यावेळी त्यांनी शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासहित काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की, “खंत एकाच गोष्टी वाटते ती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेताना मी, आदित्य, अनिल परब आणि सुभाष देसाई असे चौघेच होतो. नामांतराचे ठराव मांडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एका शब्दाचाही विरोध केला नाही”.

पाहा व्हिडीओ –

माणसं मोठी झाल्यानंतर ज्यांनी मोठं केलं त्यांनाच विसरली

“मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली. मातोश्रीला सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यपालांना टोला!

“आज न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखलात. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. पण दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे, तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“जे दगा देणार असं म्हटलं जात होतं, ते सोबत राहिले. आजही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की आपल्या लोकांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आक्षेप असेल तर आम्ही बाहेर पडतो. बाहेरून पाठिंबा देतो,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

पाहा व्हिडीओ –

“तुमची नाराजी सूरतला किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षावर किंवा मातोश्रीवर येऊन सांगितलं असतं, तर बोललो असतो मी. काय आहे ते समोर येऊन बोला. आजही मी तुमच्याशी आदरानं बोलतो आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला एकदा आपलं मानलं होतं. तुमच्याशी वाद-लढाया काय करायच्या?,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांना आवाहन

“मी सांगतो, उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमधे येऊ नये. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे पोलीस दल, इतर फोर्स, इतर देशातून सैन्य आणणार असतील, तर आणू द्या. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

“उद्या कदाचित चीन सीमेवरचं संरक्षण काढून मुंबईत आणण्यात येईल. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला उद्या त्यांच्या रक्ताने मुंबईच रस्ते लाल करणार आहात का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

“हे लोकशाहीचं दुर्दैव आहे की इथे डोक्याचा वापर फक्त मोजण्याच होतो की कुणाकडे किती बहुमत आहे. माझ्या विरोधात किती आहेत, यात मला रस नाही. पण एक जरी माझा माणूस उभा राहिला तर ते मला लज्जास्पद आहे. मला बहुमताचा खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्यांना शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. त्याची फळं अशी भोगावी लागत असतील, तर त्यात त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानानं सांगतील की बघा आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचलं की नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray resigns eknath shinde mahavikas aghadi floor test sgy
First published on: 29-06-2022 at 22:05 IST