सोलापूर : ईव्हीएम मतदान प्रणालीवर सार्वत्रिक शंका उपस्थित केली जात असताना माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी उचललेले पाऊल संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर मारकडवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येऊन ग्रामस्थांशी संवाद साधत ईव्हीएम प्रणाली विरुद्ध एल्गार पुकारल्यापाठोपाठ भाजपने आमदार सदाशिव खोत आणि आमदार गोपीनाथ पडळकर हे दोघे उद्या मंगळवारी सकाळी मारकडवाडीत येऊन ईव्हीएम प्रणालीच्या बाजूने सभा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मारकडवाडीत येऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हे तीन हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र बनले आहे.
मारकडवाडी गेल्या २५-३० वर्षांपासून आमदार उत्तम जानकर यांच्या पाठीशी कायम राहिले आहे. बलाढ्य मोहिते-पाटील विरूद्ध उत्तम जानकर यांच्यात पूर्वीच्या अनेक लढायांमध्ये या गावाने जानकर यांना साथ दिली आहे. परंतु यंदाच्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत मारकडवाडीने जानकर यांच्या ऐवजी प्रतिस्पर्धी भाजपचे राम सातपुते यांना मोठे मताधिक्य दिले आहे. परंतु यात ईव्हीएम प्रणालीवर शंका घेत ग्रामस्थांनी आंदोलन चालविले आहे. ईव्हीएम प्रणालीवर झालेल्या मतदानाची पडताळणी करण्यासाठी गावकऱ्यांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान स्वखर्चाने घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु प्रशासनाने चाचणी मतदानाची प्रक्रिया थांबविल्यामुळे मारकडवाडी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा : बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद यांनी मारकडवाडीत येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्याचवेळी दुसरीकडे भाजपने या गावात केलेल्या विकासकामाचे लावलेले डिजिटल फलक चर्चेत आले असता त्यास प्रत्युत्तरादाखल ‘ईव्हीएम हटावो-देश बचावो’ असा संदेश देणारे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. शरद पवार यांचा मारकडवाडी ग्रामस्थांशी झालेला संवाद, परस्परविरोधी डिजिटल फलकांचे युद्ध सुरू असताना भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीनाथ पडळकर हे दोघे उद्या मंगळवारी मारकडवाडीत येऊन सभा घेणार आहेत. या सभेत प्रामुख्याने बलाढ्य मोहिते-पाटील गटाला लक्ष्य केले जाणार आहे. ईव्हीएम प्रणालीच्या विरोधात खोटे कथानक निर्माण करण्यामागे मोहिते पाटील यांचाच हात असल्याचा दावा खोत आणि पडळकर हे करणार आहेत. भाजपच्या सभेनंतर लगेचच दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मारकडवाडीस देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हे गाव राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र बनल्याचे मानले जात आहे.