महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून कंगणा रणौत विरोधात काँग्रेस आक्रमक ; पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी!

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केली भूमिका ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या विविध वक्तव्यांमुळे किंवा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असणाऱ्या व अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी देखील राहिलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता पुन्हा एकदा असंच वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी कंगनाने महात्मा गांधी यांच्याबाबत विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तर, कंगनाच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना, काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कंगनाच्या या वक्तव्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (बुधवार) पत्रकारपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. “ महात्मा गांधींबद्दल कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अभिनेत्री कंगना रणौतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. काँग्रेस तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवेल.”, असं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “हा राष्ट्रद्रोह आहे, काँग्रेसकडून याचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यांना जो पद्मश्री देण्यात आला आहे, त्यामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला पाहिजे व त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे. भाजपा वारंवार त्यांना पाठिंबा देत आहे, तर भाजपाने देखील याबाबत खुलासा केला पाहिजे, या अशा वक्तव्याचं ते समर्थन करतात की विरोध करतात? कारण या गोष्टी आता जास्त चालणार नाहीत. देशात लोकांचा उद्रेक व्हावा असं भाजपाला वाटतं का? हे प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस त्या वक्तव्याचा निषेध करते. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना कुणीही माफ करणार नाही. देशाची जनता देखील माफ करणार नाही आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देखील कुणी माफ करणार नाही.”

तसेच, “या विरोधात कायदेशीर कारवाईबाबत आम्ही विचार करत आहोत, आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागार सेलशी देखील याबाबत चर्चा केली आहे. आम्ही पोलिसात देखील तक्रार दाखल करणार आहोत. आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी अनेक ठिकाणी एफआयआर देखील नोंदवले आहे आणि याबद्दल आता आम्ही संपूर्ण कायदेशीर कारवाई करू.” असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.

कंगनाचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवर साधला निशाणा; म्हणाली “सत्तेची हाव असणाऱ्यांनी…”

भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला असून सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra congress to take legal action against actor kangana ranaut msr

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या