अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे सहकार विभागाने अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. सहकार विभागाने आज, सोमवारी याबाबत आदेश जारी केला. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३१ मेपर्यंत पुढे ढलण्यात आल्या आहेत. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका यातून वगळल्या आहेत. या आदेशामुळे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा आणि वृध्देश्वर या तीन साखर कारखान्यांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
बारामती व राहुरी या मतदारसंघातील अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे भारत निवडणूक आयोगाने तेथे २३ एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान जाहीर केले आहे. त्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा व्यस्त राहणार आहे. परिणामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धता होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर, मुळा आणि वृध्देश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली होती. या यादीवर सुचना आणि हरकती घेवून येत्या १ एप्रिलाला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार होती. तसेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र, राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणूका ३१ मेपर्यंत होणार नसून त्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात निवडणूका होत नसल्याने दिवाळीनंतर पावसाळा संपल्यावर आता जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मूळा आणि वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
मात्र असे असले तरी सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, राजीनामा, मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या जागेवर पदाधिकार्यांची निवड, क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झाला आहे, अशा निवडणुकांना हा आदेश लागू राहणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्ह्यातील ब वर्ग व क वर्गातील संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचे आदेश दिल्याने या श्रीरामपूर तालुक्यातील तीन सोसायट्यांच्या निवडणुकाही आता दिवाळीनंतरच होतील.
