करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही. जरी आतापर्यंत करोनाच्या प्रकरणांमध्ये किंचित घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य तज्ञ वेळोवेळी याबद्दल नवीन माहिती शेअर करत राहतात. त्यामुळे प्रशासन अजूनही काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार केला. दरम्यान दुसरी लाट ओसरत असली तर राज्यात अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आज दिवसभरात ४ हजार २८५ जण करोनामुक्त झाले. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ४९ हजार ०२९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ३ हजार ६०८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. 

राज्यात आज रोजी एकूण ३९ हजार ९८४ करोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३१ हजार २३७ झाली आहे.