मुंबई : वाढलेले तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन, पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणांवर झाल्यामुळे राज्यभरातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या धरणांतील एकूण पाणीसाठा २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.

राज्यात मोठे १३८, मध्यम २६४ आणि लघु २६२६, असे एकूण ३०२८ धरण प्रकल्प आहेत. या धरणात पंधरा एप्रिल रोजी ४७.७२ टक्के पाणीसाठा होता. पण, एप्रिल, मे महिन्यांतील वाढलेल्या तापमानामुळे झालेले बाष्पीभवन, पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठीची मागणी वाढल्यामुळे पाणी वापरात वाढ झाल्याचा परिणाम म्हणून दीड महिन्यात पाणीसाठा ४७.७२ टक्क्यांवरून २६.११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

राज्यात शनिवारी, सहा मे रोजी विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता, अमरावती विभागात सर्वाधिक ३९.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात ३७.४० टक्के, कोकण विभागात ३२.३९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८.८१ टक्के, नाशिक विभागात २५.५७ टक्के, पुणे विभागात १६.६९ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात १५ एप्रिल रोजी ४२.४२ टक्के पाणीसाठा होता. पण, सध्या सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात आहे.

राज्यातील टंचाईच्या स्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणांतील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा. कमी पावसाची शक्यता असल्यामुळे ऑगस्टअखेर पाण्याचे नियोजन करा. चालू उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नाही. पण, पुढील म्हणजे २०२७ च्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, पाण्याचा वापर वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.

पाणीसाठी ऑगस्टअखेर पुरेल

एल निनोमुळे यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला ऑगस्टअखेर पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा अपव्यय टाळून काटकसरीने, नियोजनपूर्वक वापर सुरू आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठी ऑगस्टअखेर पुरेल, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी दिली.

विभागनिहाय पाणीसाठा (टक्के) / कंसात एकूण पाणीसाठा (दलघमी)

  • नागपूर – ३७.४० (२६८०.२८)
  • अमरावती – ३९.०७ (२४०९.०९)
  • छत्रपती संभाजीनगर – २८.८१ (३९२३.७८)
  • नाशिक – २५.५७ (२२७८.१५)
  • पुणे – १६.६९ (५२९०)
  • कोकण- ३२.३९ (१३६०.७३)
  • एकूण – २६.११ (१७९४२.११)