महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला अपघाती निधन झालं. विमान अपघातात अजित पवारांचा बारामतीत मृत्यू झाला. ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोस्टही केली आहे आणि माध्यमांशी संवादही साधला.
अमोल मिटकरींची पोस्ट काय?
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!! मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय
अमोल मिटकरी यांनी काय प्रश्न विचारले?
अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?
सहावी व्यक्ती कुठे गेली?
Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.
कागदपत्रं का जळाली नाहीत? -अमोल मिटकरी
अजित पवार यांचा २७ जानेवारीचा कार्यक्रम पाहिला तर १२ नंतर एकही कार्यक्रम नव्हता. तसंच जर अजित पवारांचा मृत्यू अपघाती झाला आणि विमान कोसळून आणि जळून झाला तर मग कागदपत्रं का जळाली नाहीत? सहावा मृतदेह कुठे आहे? पायलट कसे काय बदलले गेले? मला दादांची खुर्ची पाहून रहावलं नाही म्हणून मी प्रश्न उपस्थित केले आहेत असं अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. अजित पवारांना जाऊन पाच दिवस झाले आहेत, आम्ही सगळे अजूनही धक्क्यात आहोत. अजित पवारांच्या मृत्यूच्या अनेक चर्चा होत आहेत. अजित पवारांची बॉडी ओळखण्यासारखी नव्हती असं सांगण्यात आलं. तर मग कागदपत्रं कशी जळाली नाही? असाही प्रश्न अमोल मिटकरींनी विचारला आहे. विमानात पुरेसं इंधन होतं, तरीही लँड करण्याची घाई का केली गेली? पायलट ऐनवेळी का बदलले गेले? हे प्रश्न मला विचारले गेले. त्यामुळे मी प्रश्न विचारले आहेत. माझं मन साशंक झाले म्हणून मी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. मला शंका घ्यायची नाहीये पण शंकेचं निरसन झालं पाहिजे असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

