Sunetra Pawar Women’s Day Announcement Updates : मुंबईतील प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित ‘जागतिक महिला दिन २०२६’च्या कार्यक्रमात आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महिलांवरील अन्याय अत्याचार कमी व्हावेत, अत्याचारांविरोधात आवाज उठवता यावा याकरता महिलांसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याची घोषणा आज करण्यात आली. याबाबत त्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा. महिला आयोगाच्या कार्यक्रमात महिला सन्मान पोर्टल अनावरण करण्यात आलंय. या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील सगळीकडच्या महिलांना, मुलींना त्यांच्यावर अत्याचार किंवा सायबर गुन्हे झाले तर त्यावर तक्रार नोंदवू शकता. हे पोर्टल संबंध पोलीस यंत्रणेशी जोडलं गेलं आहे. त्यांची तक्रार लगेच नोंदवली जाईल. त्यातून तत्काळ न्याय मिळण्याची व्यवस्था यात आहे. तळागाळातील मुली किंवा ज्या तक्रार करायला घाबरतात त्यांना याचा फायदा होणार आहे.”
प्रभादेवी येथे झालेल्या या महिला शक्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने, महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासह बहुमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘महिला सन्मान पोर्टल’चे अनावरण, आयोग कार्यालयातील ‘सायबर वेलनेस’ कक्षाचे उद्घाटन आणि ‘आत्मसन्मानाच्या वाटा’ या महिला आयोगाच्या पुस्तक व भित्तीपत्राचे अनावरण करण्यात आले.
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोग करत असलेले काम अत्यंत मोलाचे व महत्त्वाचे आहे. राज्य महिला आयोगाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षा व स्वावलंबनास नवी दिशा प्राप्त झाली आहे. महिला तक्रार निवारण पोर्टलच्या माध्यमातून महिलांच्या समस्या अधिक पारदर्शकतेने आणि परिणामकारकपणे सोडवण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. महिला आयोगाच्या पोर्टलमुळे राज्यातल्या कोणत्याही महिलेला घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. ही प्रणाली राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनशी जोडलेली असल्यामुळे महिलांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे”, असं यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.
