Deputy CM Ajit Pawar Dies in Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीसाठी अजित पवारांच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र डिजीसीएने दिलेल्या माहितीनुसार विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती दौऱ्यावर येत होते. त्यांच्या चार प्रचार सभा पार पडणार होत्या. मात्र तत्पुर्वी सदर अपघात घडला.

विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना बारामती मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात ठेवले गेले आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर आमदार रोहित पवार येताना दिसले. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठा आक्रोश करण्यात येत आहे.

सदर विमान हे व्हीएसआर कंपनीचे खासगी विमान होते. यात एकूण पाच प्रवाशांचे नाव समोर आले आहे. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असल्याची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेकऑफ घेतले होते. तर बारामतीमध्ये ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते.

अजित पवारांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अजित पवारांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.