महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघात झाला की घडवून आणला गेला? त्यामागे घातपात होता का? असे प्रश्न उपस्थित झाले. रोहित पवार यांनी यासंदर्भात तीन ते चारवेळा पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न उपस्थित केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही एक पोस्ट लिहून विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी २८ डिसेंबरला म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या एक महिना आधी अघोरी पूजा झाली होती असा आरोप केला आहे. यावर आता काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अमोल मिटकरींच्या सोशल मीडियावर तीन पोस्ट
अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दोन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केला आहे. अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘बारामती मध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेंत.डिसेंबर २८ डिसेंबर २०२५ रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ ही अघोरी पूजा मध्य रात्री मांडली होती आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते’, अशी माहिती अमोल मिटकरींनी पोस्ट केली आहे.

दादांच्या बंगल्यासमोर बोकड उलटे टांगून पूजा केल्याचा दावा, मिटकरींची तिसरी पोस्ट
आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की, खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला? हे भयंकर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे.#भय इथले संपत नाही. अशा तीन पोस्ट अमोल मिटकरींनी केल्या आहेत आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.
२० मार्चला अमोल मिटकरींनी काय आरोप केला होता?
अमोल मिटकरी म्हणाले होते, “व्हिएसआर विमानाच्या समोर बाबाचा एक फोटो दिसत आहे. याचा अर्थ तो त्या विमानाने प्रवास करत होता. या बाबाचे राजकीय लागेबंधे आहेत. तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता. त्याचे मोठ मोठे भक्त असून त्याची माहिती समोर आली आहे. व्हिएसआरचे मालक व्हिके सिंहबरोबरही खरातचे गुरू शिष्याचे नाते होते का?.” अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यातून अजित पवार नकोसे झाल्याचे काही लोकांना वाटत होते का? आणि त्याचा मास्टरमाईंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला गेला का? याचाही तपास एसआयटीद्वारे व्हायला हवा. अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात याचा संबंध नाकारता येत नाही.” अशोक खरात प्रकरणाशी त्यांनी हे प्रकरण जोडत दावा केला होता. आता तीन पोस्ट लिहून अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात असा संशय अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे.
अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अपघानंतर काय काय प्रश्न उपस्थित केले?
२८ जानेवारीच्या सकाळी अजितदादा निघाले तेव्हा त्यांच्यासोबत कुणी का नव्हतं?
साहिल मदन आणि यश नावाचे वैमानिक नेमक्या कुठल्या वाहतूक कोंडीत अडकले होते?
VSR कंपनीचं नादुरुस्त विमान कसं काय आणलं गेलं?
अजित पवारांच्या मृत्यूला इतके दिवस उलटले तरीही सीसीटीव्ही फुटेज का सापडत नाही?
अजित पवारांचा अपघाती मृत्यू हा खरंच अपघात आहे की घातपात?
अजित पवारांच्या विमानाचा पायलट कपूर याचा पूर्वेतिहास चांगला नाही, त्याला सुसाईड बॉम्बर म्हणून आणलं गेलं होतं का?
अमोल मिटकरी यांनी गेल्या काही कालावधीत हे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच आता तीन ट्वीट्स पोस्ट करत खळबळजनक आरोप केले आहेत. अजितदादांच्या मृत्यूमागे अघोरी पूजेचं काही कनेक्शन होतं का? याचं उत्तर आता सरकारकडून दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
