“ज्यांना काही उद्योग नाहीत…,” निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर

माणुसकी नाही म्हणणाऱ्या निलेश राणेंना अजित पवारांनी दिलं उत्तर

Maharashtra Deputy CM Ajit Pawar, NCP, BJP, Nilesh Rane, Beed Protest,
माणुसकी नाही म्हणणाऱ्या निलेश राणेंना अजित पवारांनी दिलं उत्तर

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही अशा शब्दातं त्यांनी टीका केली आहे. दरम्यान निलेश राणेंच्या या टीकेला अजित पवारांना पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं आहे.

अजित पवार शुक्रवारी बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. सेवेत सामावून घेण्याचं निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने करोना काळातील कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन थेट अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असता दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या.

“अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

या घटनेसंबंधी बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, “जे येतात त्या सर्वांना मी भेटत असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. ३० वर्षांपासून हेच काम करत असून पुढेही जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत तेच करणार आहे. मी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काहीजण एकदम आडवे आले, आमचा ताफा निघतो तेव्हा रस्ता मोकळा असतो,त्यामुळे असं कोणी वाहनासमोर येऊ नये. आम्ही वेळ दिली होती, भेटा, चर्चा करा निवदेन द्या…चर्चेची तयारी आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवारांचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

“सरकार कोणाचंही असंल तर सगळेच समाधानी आहेत असं नसतात. कोणीही १०० टक्के समाधानी नसतं. ही एक मिनिटाची गोष्ट घडली, पण लगेच त्याची ब्रेकिंग सुरु झाली. त्याआधी बैठक झाली, त्यात काय झालं त्याचं काही दाखवलंच नाही,” अशी खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली.

निलेश राणेंच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता, “ज्यांना काही उद्योग नाहीत ते अशी टीका करत असतात. टीका कोण करत आहे…म्हणजे ती व्यक्ती कोण आहे यावरुन त्या टीकेला महत्व असतं. त्यांच्या टीकेकडे कोण लक्ष देतं,” असा टोला त्यांनी लगावला.

निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“बीडमध्ये उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मीडियावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही,” अशी टीका करत निलेश राणे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

भाजपा आमदार सुरेश धस यांचीही टीका

घटनेवरून आक्रमक होत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं. “आरोग्यमंत्री केवळ जालना जिल्ह्यपुरतेच आहेत का? त्यांच्या जिल्ह्यला एक आणि इतर जिल्ह्यला एक न्याय कसा,” असा प्रश्न उपस्थित करत आमदार धस यांनी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराच दिला.

“करोनाच्या काळात सख्खा भाऊ किंवा आई-वडीलही जवळ येत नव्हते. त्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक होते. नोकरी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले हे सरकारच्या अकार्यक्षमतेचेच प्रतीक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन उभे करावे. आपण सर्व सहकार्य करू,” अशी ग्वाहीही आमदार धस यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar on bjp nilesh rane beed protest sgy