scorecardresearch

‘घरी बसा म्हणणाऱ्या’ अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “फक्त डायलॉगबाजी…”

मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही, अजित पवारांची टीका

‘घरी बसा म्हणणाऱ्या’ अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “फक्त डायलॉगबाजी…”
संग्रहित

मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी असा दावाही अजित पवारांनी केला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार काय म्हणाले आहेत –

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्वत:ची मंत्रीपदे घेतली आणि इतर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले, हा तर लोकशाहीचा खून आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे,” अशी टीका अजित पवार यांनी शनिवारी चिंचवडला केली.

..तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची गरज नाही, त्या दोघांनीही घरीच बसावे – अजित पवार

पवार म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम सुरू होते. मात्र, सरकार पाडून महाराष्ट्राला अस्थिर करण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री आहेत. अशा मंत्रीमंडळाचा राज्यासाठी काडीचाही उपयोग नाही. इतरांनी तुमच्या दोघांकडे फक्त बघत बसायचे की, तुम्ही दिल्लीला कितीवेळा जाता ते मोजायचे. मुख्यमंत्री नुसतीच दिल्लीवारी करत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, याची नेमकी अडचण त्यांनी जनतेला सांगितली पाहिजे. मंत्रीपदाची आस अनेक आमदारांना आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी. पालकमंत्री नाहीत म्हणून जिल्हास्तरीय महत्त्वाचे निर्णय रखडलेले आहेत. सरकारच्या गोंधळी कारभारामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. यातून मार्ग निघेल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आता खऱ्या अर्थाने ‘कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र’, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे”.

फडणवीसांचं प्रत्युत्तर

“माहिती असतानाही फक्त राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना अधिकार होते. त्याआधीही आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना हे अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नव्हेत देशात ही पंरपरा आहे. सरकार जनतेचं असून, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. जनताच महाराष्ट्रात निर्णय घेईल,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

….लवकरच मंत्रीमंडळ विस्तार

“कालच मुख्यमंत्र्यांनी विस्तार लवकर होईल असं स्पष्ट सांगितलं आहे. मी तर म्हणतो त्यापेक्षाही लवकर होईल. सुप्रीम कोर्टाने मंत्रीमंडळ विस्तार करु नका असं सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि त्याचा काही संबंध नाही,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. “अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना बोलावंच लागेल. त्यांच्या काळातही ३०-३२ दिवस पाचच मंत्री होते. पण हे विसरुन त्यांना बोलावं लागत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“आमदार शिंदे गटातून बाहेर पडणार,” अजित पवारांचा दावा, शहाजीबापू म्हणाले “त्यांना राजकारणापेक्षा भविष्यात…”

फ्रेंडशिप डे असून शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी काहीजण करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “राजकारणात कोण काय म्हणतं याला नाही तर परिस्थिती काय आहे याला महत्त्व नसतं. हा काय बोलला, तो काय बोलला यावर उत्तर द्यायला मी रिकामटेकडा नाही”.

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका सुरु असल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले “भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचाही मतदारसंघ होता. पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना-भाजपा आता युती म्हणून लढणार आहेत. जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचा पक्ष मजबूत केला तरी आमची सर्व शक्ती सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार आहोत”.

“या १६ मतदारसंघात बारामती मतदारसंघही आहे. या १६ मतदारसंघाला केंद्रीय भाजपाने प्रभारी म्हणून केंद्रीय नेते दिले आहेत. निर्मला सितारमन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीला येतील,” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra deputy cm devendra fadnavis on ncp ajit pawar maharashtra cabinet expansion sgy

ताज्या बातम्या