राहाता: शासनाचा कोणत्याही प्रकारचा करारनामा व परवाना न घेता, बेकायदेशिर व अवैधरित्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरुन डिझेल टँकरमध्ये भरुन गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जात असलेला अवैध डिझेलचा टँकर त्यात ३० लाखांचे डिझेल व २५ लाख रूपये किंमतीचा टँकर असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. टँकर चालकाला अटक करण्यात आली. ३ जण फरार आहेत.
ही कारवाई मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. महादेव डांगे ( वय ५० शिवाजीनगर, नेरुळ नवी मुंबई, मुळ रा. पिंपळवाडी, ता. बार्शी, सोलापुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, टँकर (एमएच. ४३ बीपी ५०८५) हा अवैधरित्या पेट्रोल पंपावरुन डिझेल भरुन सुरजगड (जि. गडचिरोली), येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळली.
पथकाने तातडीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृध्दी महामार्ग पोल क्रमांक ५२० येथे सापळा रचुन थांबले. त्यांना टँकर येतांना दिसुन आल्याने त्यांनी टँकर ताब्यात घेवुन पुरवठा अधिकारी कोपसे यांच्या समक्ष टँकरवरील चालकास ताब्यात घेतले. चालकाने फरार असलेल्या ३ जणांच्या सांगण्यावरुन साई प्रसाद पेट्रोल पंप, राज्यमार्ग ४४ वरील हिंदुस्थान पेट्रोल पंप व शहापुर खर्डी रस्त्यावरील हिदुस्थान पेट्रोल पंपावरुन डिझेल भरुन ते सुरजागड (जि.गडचिरोली) येथे घेवुन जात असल्याबाबत कळवल्याचे सांगितले. पथकाने ३० लाख रूपये किंमतीचे ३४ हजार लिटर डिझेल व २५ लाख रूपये किंमतीचा टँकर असा ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही माहिती दिली. ताब्यातील आरोपी चालकाविरुध्द कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
