अहिल्यानगर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला येथे ‘आपला मावळा’ संघटनेने गडसंवर्धन, स्वच्छता मोहीम उत्साहात राबवली. खासदार नीलेश लंके लंके यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा १४ वा टप्पा ठरला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमी मावळ्यांनी इतिहास जतनाच्या कार्यात आपला वाटा उचलला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी ऐतिहासिक नाळ जुळलेला जिंजी किल्ला हा दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. छत्रपती राजाराम महाराजांच्या संघर्षकाळात या किल्ल्याने तात्पुरत्या राजधानीचे स्वरूप धारण करत स्वराज्य टिकविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर जिंजी गडावर गडसंवर्धनाची मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेदरम्यान गड परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. प्लास्टिक कचरा गोळा करणे, झाडाझुडपांची छाटणी व साफसफाई, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराची स्वच्छता, गडाच्या मूळ रचनेला हानी पोहोचवणारे घटक दूर करणे अशा विविध कामांमध्ये स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी उद्योजक बळवंतराव जगदाळे, पी. एम. जी. भास्कर, उद्योजक श्री.साळुंखे, पांडुरंग सुर्वे, शाहीर विजय तळेकर, आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, प्रा.सीताराम काकडे, मोईन काश्मिरी, योगिराज गाडे, सुधीर लकुडझोडे, निखिल निंबाळकर आदीं उपस्थिती होते.

शिवगर्जनेने दुमदुमला गड

महाराष्ट्र दिन जिंजी गडावर साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास गेला. भगव्या झेंड्यांच्या साक्षीने आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

गडाच्या पायथ्याशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक, भरतनाट्यमचे सादरीकरण तसेच शिवपोवाड्यांच्या जोशपूर्ण गजरात वातावरण भारावून गेले. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्या सांस्कृतिक परंपरांचा संगम घडवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

प्रवासादरम्यान जंगी स्वागत

अहिल्यानगर ते जिंजी या प्रदीर्घ प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मावळ्यांचे स्वागत करण्यात आले. करमाळा, सोलापूर, विजापूर, बेंगलोर तसेच जिंजी येथे स्थानिक मित्रपरिवाराने खासदार नीलेश लंके व मावळ्यांचे स्वागत केले, स्वयंसेवकांसाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाभावामुळे मोहिमेला आपुलकीचा आणि एकात्मतेचा भावनिक स्पर्श लाभला.

‘गडकोट जपणे हीच खरी देशसेवा’

यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले, “गडकोट जपणे म्हणजे आपल्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करणे होय. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्र दिन साजरा करताना स्वराज्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.