Phaltan Hospital Dr Rajendra Rupanwar Suicide Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येने राज्यातील वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेतील प्रशासकीय व राजकीय दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींना शस्त्र परवान्यासाठी (गन लायसन्स) आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. रूपनवर यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
द इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मांडवे या छोट्या खेड्यातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या डॉ. रूपनवर यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. गेल्या दीड वर्षांपासून ते फलटण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होते. सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटस, इन्स्टाग्राम रील्स आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपल्यावरील राजकीय दबाव आणि कामावरून काढून टाकण्याच्या धमक्यांविषयी वारंवार आवाज उठवला होता.
हाताच्या तळव्यावर लिहिली ‘सुसाइड नोट’
डॉ. रूपनवर यांनी २९ जुलै रोजी आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर सुसाइड नोट लिहून ती व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवली होती. ‘ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन’चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अपूर्व दळवी यांनी तातडीने याची दखल घेत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ला माहिती दिली. “त्या काळात मी नवी दिल्लीत परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या आंदोलनात व्यस्त असल्याने राजेंद्रच्या फोनकडे तातडीने लक्ष देऊ शकलो नाही, याचे मला अतिशय वाईट वाटते,” अशी खंत डॉ. दळवी यांनी व्यक्त केली.
‘आयएमए’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी तत्काळ फलटण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीला मदाने यांच्याशी संपर्क साधून चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी डॉ. मदने यांनी रूपनवर सुखरूप असून भावाच्या घरी असल्याचे सांगितले. मित्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. रूपनवर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटून परिस्थिती सांगण्यासाठी मुंबईत आले होते; मात्र त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट होऊ शकली नाही.
उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मानेला गंभीर दुखापत झालेल्या डॉ. रूपनवर यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ३१ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
वैद्यकीय अधीक्षिका निलंबित
दरम्यान, कनिष्ठ डॉक्टरांशी असंवेदनशील वर्तन, कठोर भाषेचा वापर आणि प्रशासकीय अनागोंदीचा ठपका ठेवत फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीला मदाने यांना शासनाने सोमवारी निलंबित केले. याच रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने २०२५ मध्ये कामाच्या तणावातून आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर आता ही दुसरी घटना घडल्याने आरोग्य विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘मार्ड’कडून निष्पक्ष चौकशीची मागणी; सातारा पोलिसांत गुन्हा वर्ग
या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी ‘मार्ड’चे (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी केली आहे. डॉक्टरांच्या मानसिक छळाला आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दादर रेल्वे पोलिसांनी रूपनवर यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवला असून, हे प्रकरण आता पुढील तपासासाठी सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. “दादर जीआरपीकडून हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून सातारा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे,” अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
