सावंतवाडी : महाराष्ट्रात यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे कामकाज कसे चालायचे हे सर्वानी पाहिले आहे. गोवा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ जनतेपर्यंत पोहचविणे सुलभ होते. महाराष्ट्रातही लवकरच डबल इंजिनचे सरकार यावे, अशी भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केली.

   मालवण येथे आयोजित अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशन निमित्ताने मालवण दौऱ्यावर आलेल्या गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत करत भव्य सत्कार केला. यावेळी भव्य पुष्पहार आणि आंब्यांचा हार घालून डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, उद्योजक डॉ. दीपक परब, विलास हडकर, विशाल परब, यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने पक्षात कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. पद मिळो अथवा न मिळो कार्यकर्ता पद हे कायम सोबत आहे. आपणही भाजपत कार्यकर्ता म्हणून काम करताना विविध पदे भूषवली. कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास भाजपमुळे शक्य झाला. जनतेचा पाठिंबा मिळाला, पक्षाने नेहमीच विविध जबाबदारी देऊन विश्वास दाखवला. आज दुसरी टर्म मुख्यमंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडत असताना केंद्रात सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान कामांमुळे अधिक ऊर्जा मिळते. आपल्यासारखी ऊर्जा महाराष्ट्रात मिळावी यासाठी येथेही डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.