Maharashtra Drought 2026 : राज्य सरकारने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय २६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचं नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना मदत कधीपासून मिळणार? शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार? सरसकट मदत मिळणार का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या २६५ तालुक्याला दिली जाणारी मदत ही सरसकटच असणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज (२७ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आहे? सरसकट मदत मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”आपण काल २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या सर्व तालुक्यांना दिली जाणारी मदत ही सरसकटच दिली जाणार आहे.”

“या संदर्भात ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. १२ उपाययोजना तातडीच्या आहेत, त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आपण ट्रिगर-१ मध्ये असा आदेश काढलेला आहे. आता पुढची कार्यवाही देखील आपण सुरू केलेली आहे. काही प्रमाणात पंचनामे देखील सुरू केलेले आहेत. आता आपण शेतकऱ्यांना योग्य मदत देखील करणार आहोत. त्याबाबतही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इतर तालुक्यांचाही समावेश करणार?

“काही ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की यामध्ये आमच्या तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. मात्र, त्या तालुक्यांची देखील पाहणी करून आपण ट्रिगर-३ मध्ये समावेश करणार आहोत. या पार्श्वभूमीवर ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याच्या अनुषंगाने सरकार पावलं उचलत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत कधीपासून मिळणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की, “२६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे आता आपोआपच सर्वच सवलती शेतकऱ्यांना मिळतील. लवकरच अधिकच्या सवलती शेतकऱ्यांना मिळणार आहेत.”