Maharashtra Drought 2026 : राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय २६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, दुष्काळ जाहीर झाला असला तरी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यावर बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी मोठं भाष्य करत थेट तारीख सांगितली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार? सरसकट मिळणार का? खात्यात पैसे कधी जमा होणार? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री भरणे यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “खरं तर या वर्षी सुपर एल निनोच्या संकटामुळे आज आपल्या भागात खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्वच आमदार आणि खासदारांनी आपआपल्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी केली आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आमची सरकार म्हणून जबाबदारी आहे.”
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?
“राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता शेतकऱ्यांना ज्या काही सवलती किंवा ज्या गोष्टीत मदत करता येईल, ती मदत आम्ही करणार आहोत. सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनाम्याचं काम सुरू केलं आहे. आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सुट्टी न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे तातडीने पंचनामे करा आणि आम्हाला अहवाल द्या. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली जाईल. अगदी तारीख सांगायचं म्हटलं तर दिवाळीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांना मदत करू”, असं मोठं भाष्य कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार का?
राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “आपण २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. या सर्व तालुक्यांना दिली जाणारी मदत ही सरसकटच दिली जाणार आहे. या संदर्भात ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. १२ उपाययोजना तातडीच्या आहेत, त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आपण ट्रिगर-१ मध्ये असा आदेश काढलेला आहे. आता पुढची कार्यवाही देखील आपण सुरू केलेली आहे. काही प्रमाणात पंचनामे देखील सुरू केलेले आहेत. आता आपण शेतकऱ्यांना योग्य मदत देखील करणार आहोत. त्याबाबतही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इतर तालुक्यांचाही समावेश करणार?
“काही ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की यामध्ये आमच्या तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. मात्र, त्या तालुक्यांची देखील पाहणी करून आपण ट्रिगर-३ मध्ये समावेश करणार आहोत. या पार्श्वभूमीवर ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याच्या अनुषंगाने सरकार पावलं उचलत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
