मुंबई : दुष्काळी स्थितीमुळे धान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आणि उत्सवाच्या तोंडावर वाढलेली मागणी यांमुळे राज्यभर महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने डाळी, कडधान्य, तांदूळ यांच्या दरांत महिन्याभरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे भावही कडाडले असून कांदा, लसूण या दैनंदिन अन्नघटकांच्या दरांनी उसळी घेतली आहे.
दुष्काळाच्या भीतीमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्यक्षात डिसेंबरपासून महागाईच्या झळा आणखी तीव्र होईल, असा इशारा बाजार विश्लेषकांनी दिला आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के नोंदवण्यात आला. रिझर्व्ह बँकेने आखून घेतलेली चार टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची मासिक निर्देशांकाची ही सलग चौथी वेळ. यात खाद्यान्न महागाईचा वाटा सर्वाधिक असून त्याचा दर ऑगस्टमधील ५.९७ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये ७.७४ टक्क्यांवर झेपावला.
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये अधिक महागाई दर नोंदवला जाण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, तूर आदी पिके वाळून गेल्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या तुलनेत डाळींच्या दरांत प्रति किलो १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. ‘पुणे मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज ८० ते ९० टन डाळींची आवक होते. कडधान्य, डाळींची लागवड देशातील अन्य भागांत केली जाते. तसेच, परदेशातून डाळ आयात करावी लागते.
गेल्या महिनाभरात सर्व प्रकारचे जिन्नस महागले आहेत,’ अशी माहिती मार्केट यार्डातील भुसार व्यापार्यांची शिखर संघटना ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. डाळींसह सर्वच प्रकारच्या धान्य महागाईचा सर्वाधिक परिणाम विदर्भात जाणवत आहे. पावसाने ओढ दिल्याने बहुतांश भाज्यांचे दर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे.
कांद्याने सत्तरी पार केली असून, बटाट्याचे दर मात्र तुलनेने स्थिर आहेत. पण लसणाच्या दरात मोठी वाढ झाली असून, तो सध्या सुमारे २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. गहू आणि खाद्यतेलाचे दर चढे असले तरी महिनाभरात त्यात मोठी वाढ झालेली नाही. दसरा-दिवाळीच्या तोंडावर मागणी वाढून या घटकांच्या किमतीही कडाडण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
