मुंबई : राज्य सरकारने २६५ दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केल्यावर या यादीत समाविष्ट न झालेल्या तालुक्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. तालुके वगळल्यावरून सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आदींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील दोन वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. तालुक्यांचे राजकारण पेटल्यानेच पाहणी करून दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांचा पुढील आदेशात समावेश केला जाईल व मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागली.

कमी पाऊस झाल्याने राज्यातील शेतीची परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती असलेल्या २६५ तालुक्यांची यादी जाहीर केली. राज्यातील ३५८ पैकी २६५ म्हणजेच ७५ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ९३ तालुक्यांचा समावेश झालेला नाही. यावरून राजकारण सुरू झाले आहे. कमी पाऊस झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्र्म्हपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही यादीत ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश झालेला नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कोकणात यंदा परिस्थिती गंभीर असताना सरकारने कोकणातील तालुके वगळल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केला. कोकणात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे भातशेती आणि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनीला भेगा पडल्या असून पंपाने पाणी देऊनही पिके सुकत आहेत. एवढी भीषण परिस्थिती असतानाही सरकारने कोकणाला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप जाधव यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा, ब्रम्हपुरी आदी तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आकड्यांचा खेळ करू नये. अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात मुनगंटीवार हे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश न झाल्याने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. मुखेड हा चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांचा मतदारसंघ. विरोधकांनी टीका केल्याने अशोक चव्हाण यांनी वगळण्यात आलेल्या दोन तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने ३२ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. सर्वपक्षीय आमदारांची आपल्या तालुक्यांचा यादीत समावेश व्हावा अशी मागणी असल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.