मुंबई: राज्यातील दुष्काळ निवारणासाठी महायुती सरकारने सुमारे ५७ हजार कोटी रुपयांची केंद्राकडे मागणी केली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ३५ हजार कोटी तर दुष्काळ निवारणासाठी पुरक योजनांसाठी २२ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत ३०४ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून अजूनही काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत एक कोटी २७ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

त्यानुसार या दुष्काळी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रूपये अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे मदत जमा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी केली आहे, त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जाणार नाही. ज्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अजूनही ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर्स आयडी) मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसी आधारेच अग्रिम दिली जाईल. ही अग्रिम मदत दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मदत वाटप सुरु झाले आहे.

राज्यातील दुष्काळी भागाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकारच्या मदतीच्या निकषानुसार ३५ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्रास पाठविला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेत पिकांचे नुकसान, चारा छावण्या, पाणी पुरवठा यासाठी लागणाऱ्या मदत निधीचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या( एनडीआरएफ) निकषात न बसणाऱ्या बाबींवर मदतीसाठी २२ हजार कोटींच्या विशेष मदतीचा मागणी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार ३.० अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने ५०० कोटींची तरतूद केली आहे. तसेच केंद्राकडेही भरीव मदतीची मागणी करण्यात आली आहे. तसेच अकोला, जळगावसह काही महापालिका, नगरपालिकांनी सध्याच्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने पर्यायी जलस्त्रोतापासून पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच धरणांमधी गाळ काढण्यासह एनडीआरएफच्या निकषात न बसणाऱ्या मात्र दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनाचा या प्रस्तावात समावेश करण्यात आला असून केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.