रत्नागिरी: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केवळ काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून भागणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये कोकणावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोकणात गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने भातशेतीसह खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा पडत असून शेतांमध्ये पाणी साठत नसल्याने शेतकऱ्यांना पंपाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. मात्र, पाणी देऊनही पिके सुकत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

कागदोपत्री निकषांपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती पाहा, अशी भूमिका मांडत कोकणातील तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीच पत्र दिल्याचेही जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाल्यानंतर ती प्रत्यक्षात मिळविताना विविध कागदपत्रे, अटी आणि निकषांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील अनुभव पाहता मदतीसाठीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती जाधव यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मदत देण्याच्या प्रक्रियेत अशा प्रकारच्या जाचक अटी नव्हत्या, असा दावाही त्यांनी केला. सध्याच्या सरकारने कोकणातील पावसातील खंड, पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष शेतीचे नुकसान यांचा स्वतंत्रपणे विचार करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी कोकणातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि दुष्काळाचे निकष यांच्यातील विसंगतीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कोकणातील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार का आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.