मुंबई: राज्यातील ३०८हून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असतानाच राज्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील काही भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४१८ गावे आणि १ हजार ५६८ वाड्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. त्यासाठी एकूण ४७८ टँकर धावत आहेत. त्यापैकी १० शासकीय, तर ४६९ खासगी टँकर आहेत.

पाणीटंचाईची ही स्थिती प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र दर आठवड्याला ही परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे.

आकडेवारीनुसार ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान राज्यातील ३६२ गावे आणि १ हजार ३५४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी ४११ टँकर कार्यरत होते. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच १४ ते २० सप्टेंबर या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या ३६२ वरून ४१८ वर पोहोचली, म्हणजेच ५६ गावांची वाढ झाली आहे. तसेच टँकरवर अवलंबून असलेल्या वाड्यांची संख्याही २१४ ने वाढून १ हजार ५६८ झाली आहे. मात्र, एकूण टँकरची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४११ वरून ४७९ वर आली आहे. यामध्ये शासकीय टँकरची संख्या १० इतकीच असून खासगी टँकरची संख्या वाढलेली आहे.

मराठावड्यात गंभीर स्थिती

  • छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये टँकरची मागणी कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल तसेच अन्य स्थानिक जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील काही भागांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. पावसाचा खंड वाढल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.