राज्य निर्बंधमुक्तीच्या दिशेने ; मैदाने २५ टक्के, बंदिस्त सभागृहे ५० टक्के क्षमतेने वापरास लवकरच मुभा

राज्यात सध्या नऊ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात १० कोटी ७७ लाख लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

संजय बापट, लोकसत्ता

मुंबई : करोना रुग्णआलेख घसरत असल्याने राज्यातील सर्व निर्बंध मागे घेण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या (३ ते ७ डिसेंबर) पार्श्वभूमीवर खुली मैदाने २५ टक्के, तर बंदिस्त सभागृहे ५० टक्के क्षमतेने वापरण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे.

दिवाळीसह सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी आणि नियम पालनाबाबच्या बेफिकीरीमुळे दिवाळीनंतर करोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्यातील रुग्णसंख्या स्थिर असून, रोज एक हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. राज्यात सध्या नऊ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात १० कोटी ७७ लाख लसमात्रा देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून उर्वरित निर्बंधही मागे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांना क्षमतेच्या ५० टक्के, तर खुल्या मैदानात किंवा स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी देण्यात  येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून, त्यावर दोन-चार दिवसांत निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 करोनाचा संसर्गामुळे गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून राज्यात विविध निर्बंध लागू आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यापासून साधारणत: १५ ऑगस्टपासून टप्याटप्याने हे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. लशीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या लसवंताना उपनगरी रेल्वे, मॉलमध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात आली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांना अजूनही रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ पर्यंत तर उपाहारगृहे आणि बार रात्री १२ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शाळा, महाविद्यालये, धामिकस्थळे, चित्रपट आणि नाटय़गृहे, मनोरंजन  उद्याने आदी सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली. ग्रामीण भागांत पहिली ते चौथी तर शहरी भागांत सातवीपर्यंतच्या शाळा बंदच आहेत. सरसकट जलतरण तलाव सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त स्पर्धासाठी सराव करण्यासाठी तरण तलावांचा वापर करता येतो. तसेच क्रीडा प्रेक्षागृहावर (स्टेडियम) अजूनही निर्बंध आहेत. राज्यातील करोनास्थिती सुधारल्याने आता निर्बंध हटवावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, दिवाळीनंतर करोनास्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची भूमिका सरकारने घेतली होती.

क्रिकेट सामन्यास प्रेक्षकांना परवानगी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ ते ७ डिसेंबरदरम्यान कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्याला २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे. वानखेडेची प्रेक्षक क्षमता ३३ हजार आहे. मात्र, मुंबईकरांचे क्रिकेटवेड लक्षात घेऊन ही मर्यादा ५० टक्के करण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra eases covid curbs covid restrictions relaxed in maharashtra zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या